पोलिसांना जाब विचारणे हा गुन्हा आहे का? नीलेश राणे प्रकरणावरुन तृप्ती देसाईंचा सरकारला सवाल
नायक वृत्तसेवा, नगर
भाजपचे नेते नीलेश राणे यांच्याविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातली म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी राणे यांची बाजू लावून धरली आहे. पोलिसांना जाब विचारणे हा गुन्हा आहे का? ही पोलिसांची आणि ठाकरे सरकारची हुकूमशाही झाली, असा आरोपही देसाई यांनी केला आहे.
संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे जामिनासाठी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात आले होते. मंगळवारी नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळाला. त्यानंतर नितेश राणे गाडीत बसून न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना पोलिसांनी त्यांची गाडी रोखून धरली होती. त्यावेळी नितेश यांचे ज्येष्ठ बंधू नीलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली म्हणून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. नीलेश राणे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा राणे कुटुंबियांना वैयक्तिक द्वेषातून त्रास देण्यासाठीच आहे. नीलेश राणे पोलिसांना न्यायालयाच्या आवारात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंबंधी जाब विचारताना दिसत होते. त्यात काहीच चुकीचे नव्हते.
यापुढे पोलिसांना कोणी जाब विचारायचाच नाही का? आपल्या राज्यात ही हुकूमशाही कधीपासून आली? जमावबंदीचे उल्लंघन राज्यातील अनेक नेत्यांकडून केले जाते. मग कारवाई फक्त नीलेश राणेंवरच का? आपल्या राज्यात कायदा समान नाही का, असे प्रश्न देसाई यांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे, शिवसेना आणि राणे कुटुंबियांचा वाद सर्वांना माहितीच आहे. परंतु शिवसेनेने राणे कुटुंबियांना कोंडीत पकडण्यासाठी पोलिसांना आणि महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांना हाताशी धरून सत्तेचा गैरवापर चालू आहे का? याबाबत आपण सर्वांनी सरकारला जाब विचारलाच पाहिजे. कदाचित आम्ही जाब विचारला म्हणून आमच्यावरही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असेही देसाई यांनी म्हटले आहे.