चंदनापुरी घाटात कार उलटली; चालक जखमी!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात कार उलटल्याची घटना बुधवारी (ता.2) सकाळी घडली आहे. या अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. यावरुन पुन्हा एकदा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे अधोरेखित होत आहे.

या अपघाताविषयी डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कारचालक मनोज अरूण शिंदे (रा.आळेफाटा, ता.जुन्नर, जि.पुणे) हा बुधवारी सकाळी आळेफाटा येथून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने संगमनेरकडे जात होता. दरम्यान, चंदनापुरी घाटात आला असता त्याचवेळी शिंदे याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून बाजूच्या नालीमध्ये पलटी झाली. या अपघातात चालक शिंदे किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात झाल्याचे समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील साळवे, मनीष शिंदे, नंदकुमार बर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सदरची अपघातग्रस्त कार टोलनाका येथील क्रेनच्या साह्याने बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली. तत्पूर्वी गेल्या दोन दिवसांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
