सर्वसमावेशक समाजकारणामुळे संगमनेरचा शाश्वत विकास ः थोरात घुलेवाडी येथे ग्रामपंचायतसह विविध विकासकामांचे लोकार्पण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर कायम प्रेम केले आहे. त्यामुळे सलग आठवेळा विजय होऊन आपण विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहोत. यामध्ये सर्वसामान्य जनतेचे मोठे श्रेय आहे. येथे कायम अविश्रांत व सर्वसमावेशक समाजकारण असल्याने तालुक्याचा शाश्वत विकास झाला आहे. महसूल विभागामध्ये राबवलेली संगणकीय व डिजिटल प्रणाली ही संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचा पॅटर्न म्हणून देशात जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

घुलेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण व विविध विकासकामांचा शुभारंभ नामदार थोरात यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधव कानवडे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, सभापती सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, भाऊसाहेब कुटे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, उपसभापती नवनाथ अरगडे, अशोक हजारे, सरपंच दत्तू राऊत, उपसरपंच हरी ढमाले, सुनीता अभंग, निर्मला गुंजाळ, मच्छिंद्र राऊत, भाऊसाहेब सातपुते, चंद्रकांत क्षीरसागर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर निळवंडे कालव्यांच्या कामाला गती दिली. दोन जेसीबी कार्यरत होते तेथे आता 35 जेसीबी व यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहेत. या वर्षात सातशे कोटी रुपयांचा निधी मिळवला. लवकरात लवकर दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपला ध्यास आहे. घुलेवाडी गावचे शहरीकरण वाढते आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम झाले आहे. संगमनेर शहराला जोडणार्‍या चौपदरी रस्त्यांमुळे शहराचे वैभव वाढणार आहे. विविध सहकारी संस्था, वेगाने होत असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक वातावरण यामुळे संगमनेर तालुका हा प्रगतीमध्ये अग्रगण्य असल्याचे मंत्री थोरात म्हणाले.

नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे. प्रत्येक वाडी-वस्तीवर त्यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. घुलेवाडी गावाचा पाणी प्रश्न सोडवला आहे. घुलेवाडीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे राहण्यास प्राधान्य असल्याने येथे सुविधांचा भर द्यावा लागणार आहे. राजकारण करताना मतभेद व्हायला नको म्हणून सर्वांनी मिळून मिसळून नामदार थोरातांच्या पाठिशी उभे राहावे असे आवाहन केले. प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच दत्तू राऊत यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर मच्छिंद्र राऊत यांनी आभार मानले.


बैलगाडी मिरवणूक ठरली लक्षवेधी..
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडीमध्ये अनेक विकासकामे मार्गी लावली असून त्यांची पारंपरिक पद्धतीने बैलगाडीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पाच बैलगाड्या सजवून झालेली ही मिरवणूक अत्यंत लक्षवेधी ठरली.

Visits: 19 Today: 1 Total: 115355

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *