घरकुलांमध्ये नेवासा तालुका जिल्ह्यात अव्वलस्थानी 9 हजार 35 घरकुले मंजूर; 6 हजार 614 घरकुले पूर्ण

नायक वृत्तसेवा, नेवासा
शासनाच्या विविध योजनेतील घरकुले मंजूर करण्यात नेवासा तालुका अहमदनगर जिल्ह्यात अव्वलस्थानी आहे. गेल्या पाच वर्षांत आत्तापर्यंत तालुक्यासाठी 9 हजार 35 इतके घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी सुमारे 6 हजार 614 घरकुले पूर्ण झाली. त्यासाठी शासनाने 79 कोटी 52 लाख 80 हजार इतका खर्च केला आहे. पक्की घरे मिळाल्यामुळे लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शन व माजी सभापती सुनीता गडाख यांच्या नेतृत्वाखाली व आजी-माजी सभापती-उपसभापतींसह गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी घरकुलाबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार केला होता. त्यात तालुक्यात गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 6 हजार 329 घरकुले मंजूर आहेत. 4 हजार 596 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहे.

रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत 2016 ते 22 या वर्षात 2 हजार 511 घरकुले मंजूर करण्यात आली. शबरी घरकुल योजनेत 195 घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यामध्ये दोन्ही योजना मिळून 2 हजार 16 घरकुले बांधून पूर्ण झाली. पंचायत समितीमार्फत आत्तापर्यंत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री, रमाई, शबरी या विविध घरकुल योजनेच्या अंतर्गत 9 हजार 36 घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यात 6 हजार 614 घरकुलांची कामे पूर्ण झाली. ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मंत्री शंकरराव गडाख व माजी सभापती सुनीता गडाख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे सभापती सुनील गडाख यांचे सहकार्याने विविध योजनेंतर्गत घरकुले मंजुरी व कामात नेवासा तालुका जिल्ह्यात प्रथम असल्याचा अभिमान आहे.
– रावसाहेब कांगुणे (सभापती-नेवासा)

मंजूर घरकुलांपैकी 2 हजार 407 घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. ती लवकर पूर्ण करावीत. लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
– शेखर शेलार (गटविकास अधिकारी-नेवासा)
