पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार! अहमनगरमधील ‘पोस्को’ गुन्ह्याचा तपास; महासंचालकांकडून शाबासकीची थाप..

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तीन वर्षांपूर्वी अहमदनगर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्याचा तपास नगरचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन मुख्य आरोपीसह दोघांवर दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने आरोपीला आजन्म सश्रम कारावासासह पन्नास हजारांचा दंड तर त्याच्या आईला एक महिन्याची कैद सुनावली. राज्य पोलिसांसाठी आदर्श ठरावा अशा पद्धतीने मिटके यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्याची दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार देवून त्यांच्या कामगिरीला शाबासकीची थाप दिली आहे. पंचवीस हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सप्टेंबर 2018 मध्ये अहमदनगर शहरातील भराडगल्लीत सदरचा संतापजनक प्रकार घडला होता. या परिसरातच राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना आरोपी अफसर लतीफ सय्यद याने तिला उचलून आपल्या घराच्या छतावर नेले व तिला निर्वस्त्र करुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी आरोपीची आई मुन्नी उर्फ शमीना तेथे आली व तिने त्या लहानशा मुलीला दम देत कोणास काही न सांगण्याची तंबी देवून घरी पाठवले. पुन्हा दुसर्‍या दिवशी आरोपीने तसेच कृत्य करीत त्या निरागस मुलीला उचलून छतावर नेले व जीवाने मारण्याची धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व कोणाला काही न सांगण्याचा दम दिला. त्यामुळे घाबरलेली मुलगी घरी येवून गुपचूप बसली.

यावर तिच्या आईने विचारणा केली असता ती केवळ पोट दुखतंय असं म्हणून घाबरल्या सारखी करु लागल्याने पीडितेच्या आईने तिच्या बहिणीला फोन करुन बोलावून घेतले. त्या दोघींनी तिला विश्वासात घेवून चौकशी केली असता सदरचा संतापजनक प्रकार समोर आला. घडली घटना पीडितेच्या पित्याला समजल्यानंतर त्यांनी 15 सप्टेंबर, 2018 रोजी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भा. दं. वि. कलम 376 (ए) (बी), 354, 323, 506 सह 34 तसेच बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोस्कोे) कलम 5 (एम), 6 व 17 नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. राज्यात राजकीय व सामाजिक संघटनांनी मोर्चे काढून निषेध नोंदविले, त्यामुळे पोलिसांवरील दबाव वाढला.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास तोफखान्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पुढील तपासाची सूत्रे नगर शहराचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविली. त्यांनी या प्रकरणातील प्रत्येक बारकाव्याचा सखोल तपास करुन सक्षम पुरावे गोळा केले व अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात दोन्ही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावरील सुनावणीत या प्रकरणातील मुख्य आरोपी अफसर लतीफ सय्यद याच्यावरील भा. दं. वि. कलम 376 (ए) (बी), 354 बी, 323 सह पोस्कोतंर्गत लावण्यात आलेली कलमं सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एका वर्षाचा सश्रम कारावास सुनावला. यातील दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले.

शिवाय या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीला कोणास काही सांगू नये म्हणून तिला दमबाजी करीत आरोपी क्रमांक दोन मुन्नी उर्फ शमीना लतीफ सय्यद हिने एकप्रकारे आरोपीला सहाय्य केल्याने तिलाही या प्रकरणात एक महिन्याची साधी कैद व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास दहा दिवसांच्या अतिरिक्त कैदेची शिक्षा सुनावली. सदर गुन्ह्याच्या तपासात तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शन तर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम पाटील, उपनिरीक्षक विशाल सणस, जया तारडे, सहाय्यक फौजदार भालसिंग, हेडकॉन्स्टेबल सुयोग सुपेकर व कॉन्स्टेबल याकूब सय्यद यांचे सहकार्य त्यांना मिळाले. या प्रकरणाच्या तपासात पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी जमा केलेले पुरावे व साक्षी दोन्ही आरोपींना शिक्षा सुनावण्यात महत्त्वाचे ठरल्याने त्याची दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार देवून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी जिल्ह्यातील आपल्या कारकीर्दीत अनेक प्रकरणांचे तपास तडीस नेले आहेत. कर्तृत्त्ववान पोलीस अधिकार्‍यांमध्ये गणना होणार्‍या मिटके यांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या मोहिमेतही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय अनेक महत्त्वांच्या प्रकरणांचा तपास त्यांच्यावर सोपवून पोलीस अधीक्षकांनीही त्यांच्यातील वेगळेपण वेळोवेळी समोर आणले आहे. आता त्यांना राज्यस्तरीय पोलीस प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Visits: 107 Today: 1 Total: 1114573

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *