खासदार, आमदार साहेब जरा आमच्याकडेही लक्ष द्या!
पठारभागातील नागरिकांची रस्ते दुरुस्तीसाठी आर्त विनवणी
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेरचा पठारभाग म्हंटला की वर्षानुवर्षांपासून झालेली रस्त्यांची दयनीय अवस्था हीच ओळख. आजही ही ओळख तशीच पहावयास मिळत आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पठारभागातील वाडी-वस्त्याही विकासापासून कोसो दूर असल्याने अद्यापही मुलभूत सुविधांच्या अभावाची प्रत्यक्ष अनुभूती येथे मिळते. त्यात सध्या वरुणराजाचा मूड काही औरच असल्याने रस्ते ‘चिखलमय’ झाले आहेत. यातून कशीबशी वाट शोधत आपला प्रवास करण्याची दुर्देवी वेळ येथील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे व आमदार डॉ.किरण लहामटे साहेब जरा आमच्याकडेही लक्ष देवून किमान रस्ते तरी व्यवस्थित करुन द्या, अशी आर्त विनवणी रहिवाशी करत आहेत.

संगमनेर तालुक्यातील पठारभाग हा मूळतः संगमनेर तालुक्यात गणला जातो. परंतु मतदानासाठी अकोले विधानसभेला जोडला असल्याने येथील मुलभूत प्रश्न राजकीय दृष्टीकोनातून अद्यापही सुटलेले नाहीत. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज हे प्रश्न जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. उन्हाळ्यात तर महिलांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना एक-दोन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. फक्त निवडणुका आल्या की पठारभागातील मतदारांची आठवण येते. एरव्ही कोणीच डोकावून पहायला सुद्धा तयार नसतात. यामुळे वर्षानुवर्षांपासून बावपठार ते नांदूर, मोरेवाडी ते खैरदरा, भोजदरी फाटा ते पेमरेवाडी, गारोळे पठार, कुरकुंडी ते सांगडेवाडी हे सर्व रस्ते येथील नागरिकांच्या दररोजच्या रहदारीचे असूनही याकडे संबंधित लोकप्रतिनिधी आणि शासकीय विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने दयनीय अवस्थेत आहेत.

या रस्त्यांची कामे व्हावीत म्हणून अनेकदा नागरिकांनी पाठपुरावा देखील केला आहे. परंतु त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल ते लोकप्रतिनिधी आणि शासन कुठले? आता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रस्तेही वाहून गेले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्ते चिखलमय बनले आहेत. यातून कशीबशी वाट शोधत नागरिकांना आपला दैनंदिन प्रवास जीव धोक्यात घालून करावा लागत आहे. अनेकदा छोटे-मोठे अपघात घडून गंभीर दुखापत झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. आता तरी मायबाप सरकारने आणि खासदार-आमदार साहेबांनी आमचा आवाज ऐकून चिखलातील वाट सुकर करावी, अशी आर्त विनवणी पठारभागातील रहिवासी करत आहेत.

पठारभागातील समस्या काही शासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सुटण्याचे नाव घेईनात. अद्यापही येथील मुलभूत समस्याच सुटत नसल्याने मोठे प्रकल्प अथवा विकासकामांची अपेक्षाही येथील रहिवाशांनी सोडून दिली आहे. किमान रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा तरी सोडवा, अशी विनवणी करण्याची दुर्देवी वेळ येथील नागरिकांवर आली आहे. आता तरी मायबाप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देवून नागरिकांची विनवणी ऐकावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त करुया.

