बिल्डरच्या अपहरण प्रकरणी संगमनेरातील दोघे गजाआड! जळगाव पोलिसांची कारवाई; चाळीस लाखांच्या वसुलीसाठी केले होते अपहरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बायोडिझेलच्या काळ्या बाजार प्रकरणात वेळेवर पुरवठा केला नाही व त्यासाठी आगाऊ घेतलेली रक्कमही परत केली नाही म्हणून नाशिक येथील एका बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या दोन वाहनचालकांचे गेल्या बुधवारी (ता.12) जळगावमधून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात जळगाव पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे छापा घालीत अपहृत तिघांची सुटका केली आहे. या प्रकरणी संगमनेरातील दोघांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून दोघे पसार आहेत. अटक केलेल्या सर्व आरोपींना येत्या बुधवारपर्यंत (ता.19) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मयूर वसंत सोनवणे (वय 35, रा.जिजाऊ नगर, जळगाव. ह.मु.नाशिक) हे बांधकाम व्यावसायिक असून आदी संस्कार एंटरप्रायजेस नावाने नाशिक व जळगाव येथे त्यांचा व्यवसाय आहे. याच फर्मच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक व्यवहार चालतात. सुमारे चार महिन्यांपूर्वी मयूर यांनी बायोडिझेलचा ठोक व्यवसाय सुरु केला होता. या व्यवसायातून मलिक नावाच्या इसमाशी त्यांची ओळख झाली. त्यातून दोघांमध्ये बायोडिझेलचा व्यवहारही झाला. या व्यवहारापोटी मलिक याने मयूरला 80 लाख रुपये दिले होते. त्यातील 60 लाख रुपये फर्मच्या खात्यावर तर उर्वरीत 20 लाख रुपये रोख देण्यात आले होते.

या व्यवहारात ठरल्याप्रमाणे मयूर यांनी 78 लाख रुपयांचे चार बायोडिझेल टँकर मलिक यांना पाठविले होते, त्यातील दोन लाख रुपये मयूर यांच्याकडे बाकी होते. परंतु मलिकच्या म्हणण्यानुसार मयूरकडे त्याचे 18 लाख रुपये बाकी राहिले होते. ही रक्कम परत करण्याचे त्याने कबुलही केले होते, दरम्यानच्या काळात वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे चार महिने त्यांचा व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे मयूर यांना पैसे देणे जमले नाही, मात्र मलिक याने 18 लाखांचे व्याजासह 40 लाख रुपये त्यांच्याकडून मागण्यास सुरुवात केली, त्यातूनच हा वाद उभा राहला. मयूर सोनवणे नाशिकमध्ये स्थायिक झाले असले तरीही त्यांची आई मात्र जळगावातच राहत होती. त्यामुळे त्यांचे तेथे नेहमीच जाणे-येणे होते. गेल्या बुधवारी (ता.12) ते जळगावातील प्रभात चौकात पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबले असताना बिलाल गुलाम शेख नावाचा इसमाचा त्यांना फोन आला. त्याने आपणास बायोडिझेल भरण्यासाठी नोझल मशीन घ्यायचे असून तुम्ही माझ्यासोबत नाशिकला चला अशी विनवणी त्याने केली. त्याला होकार देताच काही वेळातच बिलाल आपले चारचाकी वाहन घेवून प्रभात चौकात आला व त्याने मयूरला आपल्या वाहनात बसवून नाशिककडे प्रवास सुरु केला.

या दरम्यान मयूर यांचे वाहन घेवून त्याचे दोन चालक विजय व सागर बिलाल शेख याच्या गाडीच्या मागोमाग चालले होते. ही सर्व मंडळी नाशिकला पोहोचल्यावर बिलालने त्यांना वडाळा येथील बंटी शेख याच्या कार्यालयात नेले. तेथे जाताच बिलालने मयूर यांच्या दोन्ही वाहनचालकांचे मोबाईल काढून घेतले. हा सगळा प्रकार पाहून मयूर सोनवणे घाबरले व त्यांनी बिलालकडे ‘काय झाले?’ अशी विचारणा केली. त्यावर बिलालने ‘मलिकने आम्हाला 40 लाखांची सुपारी दिली आहे, पैसे दे अन्यथा तुला सोडणार नाही. अन्यथा जळगावला नेवून तुला ठार मारील’ अशी धमकी दिली. दुसर्‍या दिवशी (ता.13) रात्री बिलाल, इम्रान व शहानवाज या तिघांनी मयूर यांना एका चारचाकी वाहनात बसवून वडाळा येथून संगमनेरच्या दिशेने प्रस्थान केले. संगमनेरात आल्यानंतर येथून मजाज दाऊद सय्यद हा गाडीत बसला. शुक्रवारी (ता.14) ते सगळे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रस्त्यावरील एका जिनिंगमध्ये पोहोचले. तेथे एका खोलीत डांबून ठेवत त्यांना पुन्हा एकदा 40 लाख रुपये देण्याची व न दिल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यावेळी घाबरलेल्या मयूर यांनी पैसे मिळविण्यासाठी पत्नीला फोन करण्याच्या बहाण्याने आपला मोबाईल मागितला व त्यावरुन फोन करताना गुपचूप घडला प्रकार आपल्या पत्नीला सांगून आपले लोकेशनही त्यांना पाठविले. या आधारावर मयूर यांची पत्नी शमिका व बहीण माधुरी चव्हाण यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात जावून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना घटनेची माहिती दिली.

त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांना सदरचे लोकेशन शेअर करीत पथकासह त्यांना रवाना केले. सदरच्या लोकेशननुसार अजिंठा येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांना पाहून दोघे तेथून पसार झाले. तर अमजद दाऊद सय्यद (वय 42), मजाज दाऊद सय्यद (वय 34, दोघेही रा.संगमनेर), बिलाल गुलाम शेख (वय 45), अब्दुल नासीर गफ्फार (वय 34, दोघेही रा.खुलताबाद), इम्रान अलियास शेख (वय 30) अजीम अजीज शेख (वय 26, दोघेही रा.नेवासा), शहानवाज वजीर खान (वय 39, रा.नाशिक) व अबुबकर सलीम मलिक (वय 39, रा.सिल्लोड) अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांना जळगाव न्यायालयाने येत्या बुधवारपर्यंत (ता.19) पोलीस कोठडीत पाठविले आहे. गेल्या काही दिवसांत टीईटी पेपरफुटीसह आता बायोडिझेल प्रकरणातील अपहरण नाट्यात संगमनेरातील आरोपींची नावे समोर आल्याने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाचे त्याच्या दोन वाहनचालकांसह 40 लाख रुपयांसाठी जळगावमधून अपहरण करीत त्यांना नाशिक, संगमनेर व अजिंठा येथे डांबून ठेवण्याच्या प्रकरणात संगमनेरातील दोन आरोपींचा समावेश आहे. या सर्व आरोपींनी सिल्लोड येथील अबुबकर मलिक याच्याकडून 40 लाखांच्या वसुलीची सुपारी घेतली होती. संगमनेरातील आरोपीचा यापूर्वीही नाशिकमधील बेकायदा गावठी कट्टा प्रकरणात समावेश असल्याची व त्या प्रकरणात तो जामिनावर असल्याची माहिती मिळाली आहे.

Visits: 89 Today: 2 Total: 1116121

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *