जिल्ह्याची वाटचाल तिसर्या लाटेच्या दिशेने! आज आढळली उच्चांकी रुग्णसंख्या; सरासरीही साडेतिनशेच्या घरात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात वाढत असलेल्या संक्रमणाचा फटका आता अहमदनगर जिल्ह्यालाही बसू लागला असून गेल्या 5 जानेवारीपासून चढाला लागलेली रुग्णसंख्या आज थेट साडेनऊशेच्या आसपास पोहोचली आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही सव्वाचार हजारांच्या पुढे सरकली असून अहमदनगर जिल्हा तिसर्या लाटेच्या दिशेने प्रवास करु लागला आहे. आजच्या अहवालातूनही अहमदनगर महापालिका क्षेत्रात उच्चांकी 359 रुग्ण आढळले असून सर्वात कमी 13 रुग्ण जामखेडमध्ये आढळले आहेत. संगमनेर शहरातील तिघांसह एकूण 35 जणांनाही कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनाही कोविडचे संक्रमण झाले असून त्यांनीसंपर्कातील व्यक्तिंना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नववर्षाच्या सुरुवातीपर्यत आटोक्यात असलेल्या कोविड संक्रमणात 5 जानेवारीपासून वाढ होण्यास सुरुवात झाली. चालू महिन्याच्या सुरवातीच्या चार दिवसांत संक्रमणाचा वेग मात्र सरासरीनुसार होता. या कालावधीत सरासरी 54.75 रुग्ण दररोज या गतीने जिल्ह्यात 219 रुग्णांची भर पडली. तर 5 जानेवारीपासून चढला लागलेल्या संक्रमणाने 5 ते 10 जानेवारी या सहा दिवसांत जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत 197 रुग्ण दररोज या वेगाने 1 हजार 182 तर त्यानंतरच्या सातच दिवसांत सरासरीत मोठी वाढ होवून जिल्ह्यात 642 रुग्ण दररोज या गतीने तब्बल 4 हजार 494 रुग्णांची भर पडली. गेल्या सतरा दिवसांचा विचार करता जिल्ह्यात 346.76 रुग्ण रोज या वेगाने आत्तापर्यंत 5 हजार 895 रुग्ण वाढले आहेत.

संक्रमणाचा सर्वाधीक वेग अहमदनगर महापालिका क्षेत्रात असून तेथे गेल्या सतरा दिवसांत सरासरी 111.35 या गतीने 1 हजार 893, राहाता तालुक्यात 36.88 या सरासरीने 627 रुग्ण, नगर तालुका हद्दित सरासरी 24.53 या गतीने 417 रुग्ण, अकोले तालुक्यात सरासरी 17.53 या गतीने 298 रुग्ण, श्रीरामपूर तालुक्यात सरासरी 17.05 या गतीने 290 रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील या पाच ठिकाणी संक्रमणाची गती अधिक असून संगमनेर तालुका जिल्ह्यात नवव्या स्थानी असून येथून दररोज 11.94 रुग्ण या गतीने आत्तापर्यंत 203 रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी सरासरी जामखेड तालुक्याची असून तेथून आत्तापर्यंत 4.41 या गतीने अवघे 75 रुग्ण आढळले आहेत.

गेल्या दोन दिवसांत संगमनेर तालुक्यातील रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत असून रविवारी 27 तर आज 35 रुग्ण आढळले आहेत. आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील अशोक चौक येथील 45 वर्षीय महिला व संगमनेर असा उल्लेख असलेल्या 33 वर्षीय तरुणासह 30 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या शिवाय ग्रामीण भागातील आरामपूर येथील 65 वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथील 83 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, घारगाव येथील 50 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 55 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण व 53 आणि 24 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 48 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण,

कर्जुले पठारावरील 21 वर्षीय तरुण, माळेवाडीतील 26 वर्षीय तरुण, सांगवी येथील 58 वर्षीय इसम, साकूर येथील 20 वर्षीय तरुण, समनापूर येथील 34 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 29 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 57 वर्षीय इसमासह 31, 29 वर्षीय दोघे व 21 वर्षीय तरुण, 26 व 23 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तिगांव येथील 31 वर्षीय तरुण, जांबुत खुर्द येथील 29 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 44 वर्षीय इसम, निळवंडे येथील 70 वर्षीय महिला, देवगाव येथील 43 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्द येथील 52 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण व निमगाव पागा येथील 24 वर्षीय तरुण अशा एकूण 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आज 929 रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधीक 359 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात, तर नगर तालुका 70, अकोले 56, श्रीगोंदा 54, श्रीरामपूर 52, राहाता 41, पारनेर 39, संगमनेर 35, लष्करी रुग्णालय 31, भिंगार लष्करी परिसर 30, कर्जत 25, शेवगाव 23, पाथर्डी 22, इतर जिल्ह्यातील 21, कोपरगाव 20, नेवासा 19, राहुरी 18, जामखेड 13 व इतर राज्यातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 64 हजार 891 झाली आहे.

संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम पुन्हा एकदा कोविड बाधित झाले आहेत. सध्या ते विलगीकरणात असून गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या व्यक्तिंनी आपली काळजी घ्यावी, कोणतीही शंका वाटत असल्यास चाचणी करुन घ्यावी. मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

