तालुक्याच्या पठारभागात चोरट्यांची संक्रांत! बंद पाळून घारगावात निषेध; पोलीस निरीक्षकांनी तक्रारदाराला शिव्या देत हुसकावले..

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील पठारभागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून एकामागून एका गावातून घरफोड्या आणि चोरीच्या घटना समोर येवू लागल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून पठारावरील घारगाव, बोटा, नांदूर खंदरमाळ, डोळासणे व वनकुटे परिसरात चोरट्यांनी हैदोस घातला असून सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घारगाव पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे चोरीच्या घटनांचे तपासच होत नसल्याने पठारभागात अशा घटना सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी आपल्या वाहनातील डिझेल चोरीला गेल्याची तक्रार घेवून गेलेल्या एका ट्रक चालकाला घारगावचे निरीक्षक सुनील पाटील यांनी शिवीगाळ करीत हुसकावून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांतही त्यांचा हा पोलीसी रुबाब घारगावकरांचा संताप वाढवणारा ठरला असून यासर्व घटनांचा निषेध म्हणून आज सकाळी 11 वाजता घारगावकरांनी बंद पाळून पोलिसांचा निषेध नोंदविला आहे.

गेल्या 12 जानेवारीपासून घारगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या पठारभागात चोरट्यांनी एकामागून एक घरांना लक्ष्य करीत दहशत निर्माण केली आहे. दोनच दिवसांपूर्वी खंदरमाळच्या सरपंचाचे घर फोडून चोरट्यांनी जवळपास पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लांबविला होता. त्याच रात्री चोरट्यांनी
नांदूरमध्येही धुमाकूळ घालीत एकाचवेळी चार घरे फोडली व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. या घटनाक्रमानंतरही चोरट्यांचा उच्छाद कमी झाला नाही, तेथून त्यांनी थेट घारगावचे उप डाकघर लक्ष्य करीत तेथील तिजोरीच लांबविली. गेल्या चारच दिवसांत घडलेल्या या डझनभर घटनांवरुन घारगाव पोलिसांची निष्क्रियता अगदी ठळकपणे समोर आलेली असतांना चोरट्यांनी आज पहाटे पुन्हा एकदा पठारावरील घारगावसह वनकुट्यात चार ठिकाणी चोर्या करीत घारगाव पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

आज पहाटेच्या सुमारास घारगावमधील प्रतीक बाळासाहेब गाडेकर यांच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे पत्रे उचकाटून चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील ड्रील मशिनसह वायरचे बंडल, पंखे, बॅटर्या, हेडफोन व टी.व्ही.स्क्रीन असा लाखांवर रुपयांचा मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला. असाच प्रकार वनकुटे शिवारातूनही समोर आला असून गावातील साहेबराव अनाजी हांडे, उत्तम रखमा शेळके व संदीप वाकचौरे या तिघांची बंद असलेली घरे लक्ष्य करीत चोरट्यांनी घरात प्रवेश केला व मनसोक्त उचकापाचक करीत घरातील ऐवज चोरुन नेला. ही सर्व घरे बंद स्थितीत असल्याने चोरट्यांनी नेमका किती रुपयांचा ऐवज लांबविला याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

मागील चार दिवसांत तालुक्यांत थंडीचा अंमल वाढल्याने रात्री लवकर गावे व रस्ते निर्मनुष्य होत आहेत, त्याचा फायदा घेत चोरट्यांनी संगमनेर तालुक्यातील चार पोलीस ठाण्यांत सर्वाधीक निष्क्रिय पोलीस ठाणे ठरलेल्या घारगावला लक्ष्य केले असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून एकामागून एक चोरीच्या घटना घडत आहेत. त्यातच शुक्रवारी डोळासण्याच्या काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी पळविण्याच्या घटनेनंतर माहुलीनजीकच्या राजस्थान ढाब्यावर उभ्या असलेल्या परराज्यातील एका मालवाहतूक ट्रकमधील सुमारे दोनशे लिटर डिझेल चोरुन नेण्याची घटनाही घडली.

याबाबत संबंधित ट्रकचालक त्या ढाब्यावरुन डिझेल चोरीचे उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फूटेज घेवून मोठ्या अपेक्षेने घारगाव पोलीस ठाण्यात गेला. त्याची तक्रार ऐकून व त्याच्याकडील सीसीटीव्हीचे फूटेज पाहून त्यात दिसणार्या चोरट्यांच्या वाहनाचा माग काढण्याऐवजी घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी त्या ट्रकचालकालाच उलट प्रश्न करीत त्याला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली व ‘तुम साले .. उपर कर के सोते हो, और हमें परेशान करते हों..’ असे म्हणत कोणतीही तक्रार न घेताच चक्क त्याला पोलीस ठाण्यातून अक्षरशः हुसकावून लावले. यावरुन घारगावमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून अवैध धंद्यांनी आधीच अवघ्या पठाराला विळखा घातलेला असतांना आता त्यात चोरीच्या सातत्यपूर्ण घटनांची भर पडल्याने ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात दंड थोपटले असून आज दुपारी ग्रामस्थांनी बैठक बोलाविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून घडत असणार्या या घटनांनी संपूर्ण पठारभागात दहशत निर्माण झाली असून घारगाव पोलिसांच्या निष्क्रियतेचा ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. पठारची राजधानी समजल्या जाणार्या घारगावमधील संतप्त नागरिकांनी आज सकाळी एकत्र येत ग्रामसभा बोलावण्याचा निर्णय घेतला असून तो पर्यंत गावातील दुकाने बंद करुन निष्क्रिय ठरलेल्या घारगाव पोलिसांचा निषेध केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे पठारभागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून आता त्यात चोर्या व घरफोड्यांचीही भर पडल्याने निरीक्षक पाटील यांच्याविरोधात संताप खदखदत आहे.

घारगाव पोलीस ठाणे आपल्याला जणू आंदन मिळाल्याच्या अविर्भावात असलेल्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची निष्क्रीयता संगमनेर तालुक्यात लपून राहीलेली नाही. संगमनेर तालुका ठाण्यात कार्यरत असताना अनेक प्रकरणात त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. तेथून त्यांची घारगावला बदली झाल्यापासून आता पठारभागाची रया काळवंडली असून अवैध व्यवसायांचा सुळसुळाट होण्यासह चोर्या व दहशतीच्या एकामागून एक घटना घडत आहेत, मात्र त्यातील एकाही घटनेचा तपास लावण्यात त्यांना गेल्या दोन वर्षात यश आलेले नाही.

