प्रशासनाच्या आशीर्वादाने राहुरीत वाळू माफियांचा धुमाकूळ वाळू उपसा बंद करुन माफियांविरुद्ध कडक कारवाईची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील मुळा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू वाहतूक चालू आहे. यातून नदीकाठच्या शेतकर्यांना दमदाटी व हाणामार्या करुन दहशत निर्माण केली जात आहे. या बेकायदेशीर वाळू उपसाविरोधात क्रांतीसेना, नदीकाठचे शेतकरी व ग्रामस्थांनी वाळू उपसा बंद करून या माफियांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, 7 जानेवारी, 2022 रोजी मुळा नदीकाठचे शेतकरी यशवंत प्रभाकर म्हसे यांना सकाळी साडेआठ वाजता वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आली. दिवसाढवळ्या नदीकाठच्या शेतकर्यांना हे वाळू माफिया दमदाटी करून मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. या वाळू माफियांना कोणाचा पाठिंबा आहे? हा प्रश्न दहशतीत असलेल्या शेतकरी व ग्रामस्थांना पडला आहे. यापूर्वी वेळोवेळी अवैध वाळू उपशाबाबत तोंडी व व्हाट्सअॅपद्वारे तहसीलदारांना माहिती दिली होती. परंतु वाळू चोरी करणार्या माफियांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. वाळू चोर नदीकाठच्या शेतकर्यांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देतात. तसेच मागील महिन्यात नदीकाठ परिसरात याचप्रकारे शेतकर्यांना दमबाजी करून मारहाण करण्यात आली आहे. अशाप्रकारे हे वाळूचोर दिवसा ढवळ्या ग्रामस्थ व शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तसेच तुम्ही आमची वाळू बंद करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्यावर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करू. तुम्हाला जेलमध्ये घालू अशी धमकी दिली जाते. त्यामुळे नदीकाठचे शेतकरी व ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या वाळू चोरांमध्ये एवढी हिंमत कुणामुळे निर्माण झाली आहे, त्यांना कोणाचा वरदहस्त आहे की ज्यामुळे वाळू चोर नदीकाठच्या शेतकर्यांना, ग्रामस्थांना, गोरगरीब जनतेस वेठीस धरत आहेत, धमक्या देत आहे. यातून राहुरी तालुक्यात अशी चर्चा आहे की, महसूल व पोलीस विभागाला रसद पुरवली जात असल्याने अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाला या अवैध वाळू उपसामुळे गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाला आहे. यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यामुळे या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रभाकर म्हसे, इंद्रभान पेरणे, क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, नंदकुमार तनपुरे, यशवंत म्हसे, मच्छिंद्र म्हसे आदिंसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.