घारगावचे डाक कार्यालय फोडले; तिजोरी लांबविली नांदूर खंदरमाळ परिसरातही चोरट्यांचा धुमाकूळ, घरे फोडली

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील डाक कार्यालय चोरट्यांनी फोडून तिजोरीच चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता.12) पहाटे घडली आहे. तर नांदूर खंदरमाळ परिसरातही चोरट्यांनी घरे फोडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, घारगाव येथील डाक कार्यालयात सिमेंट व दगडांमध्ये बांधकाम केलेली लोखंडी तिजोरी आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी तिजोरी चोरून नेली. सकाळी काही नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती डाकसेवक किशोर पोळ यांना दिली. त्यांनीही घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर वरीष्ठ सहाय्यक अधीक्षक संतोष जोशी, सबपोस्टमास्तर सुमंत काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचबरोबर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान तिजोरीत किती पैसे होते ते मात्र अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, पहाटे नांदूर खंदरमाळ या दोन्ही ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरे फोडली. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऐवज चोरुन नेला असल्याचे समजते. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Visits: 138 Today: 1 Total: 1100762

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *