श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीमधून लोखंडी प्लेटची चोरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल; चोरीसाठी जेसीबी वापरल्याची शक्यता

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील औद्योगिक वसाहत परिसरातील कृष्णा सिमेंट पाईप प्रॉडक्शन कंपनीतील लाखो रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेटची चोरी झाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, औद्योगिक परिसरातील कृष्णा सिमेंट पाईप प्रॉडक्शन कंपनीतील अंदाजे दोन टन लाखो रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेटची चोरी झाली आहे. निकेत बोराडे यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या प्लेटच्या चोरीसाठी जेसीबीचा वापर करण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे. 80 ते 90 किलो वजनाची असलेली ही लोखंडी प्लेट उचलणे शक्य नसल्याने मशिनचा वापर करण्यात आला आहे. या धाडसी चोरीबाबतची माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक एस. बी. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकनगर पोलीस चौकीचे साईनाथ राशिनकर, मच्छिंद्र शेलार, रघुवीर कारखिले, बाळासाहेब गुंजाळ आदी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

या प्रकरणी अनिकेत बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान श्रीरामपूर औद्योगिक वसाहत परिसरात मोठ्या किंवा किरकोळ चोरीच्या घटना सतत घडत आहे. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ बोलावून चोरीचा तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. या चोरीत निकेत बोराडे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच रांजणखोल, टिळकनगर, दत्तनगर परिसरात पोलिसांनी आपले गस्त कायम ठेवावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
