अकोलेत पुन्हा उच्चस्तरीय कालवे पाणी हक्क संघर्ष समितीचा ‘एल्गार’! विविध मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांसह संबंधित अधिकार्‍यांना पाठविले

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांनी 3 सप्टेंबर, 2021 रोजी बाजारतळ येथे मोर्चा काढून निळवंडे धरणाच्या पाणी हक्काच्या मागण्यांबाबत तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनातील बहुसंख्य मागण्या शासन व प्रशासनाने मान्य केल्या होत्या. तरी देखील अद्याप महत्त्वपूर्ण मागण्या ‘जैसे थे’च असल्याने उच्चस्तरीय कालवे पाणी हक्क संघर्ष समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी (ता.6) आंदोलन करुन जलसंपदा मंत्र्यांसह संबंधित अधिकार्‍यांना निवेदन पाठविले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, प्रवरा नदीपात्रात होत असलेल्या जलसेतूच्या कामाला गती देऊन जलसेतूचे काम मान्य केल्याप्रमाणे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा, जलसेतूचे पिलर उभे करण्यात अडथळा ठरत असलेले रस्ते इत्यादींचे अडथळे दूर करावे, जेणेकरून या जलसेतूवरून अकोले तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे पाईप त्वरीत टाकता येतील व यावर्षी पावसाला सुरू होण्यापूर्वी वंचित गावांना पाणी देता येईल, उच्चस्तरीय कालव्यांच्या वरील बाजूस दोन्ही बाजूला डोंगराच्या पायथ्यापर्यंत तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी उच्चस्तरीय पाईप कालव्याचा विस्तार करा, 3 सप्टेंबर 2021 च्या आंदोलनात मान्य केल्याप्रमाणे जलसंपदाचे अधिकारी व शेतकरी यांनी परिसरात फिरून तयार केलेल्या लाभक्षेत्र विस्तार नकाशा व मागण्यांच्या आधारे उच्चस्तरीय कालव्यांच्या लाभक्षेत्राच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित सर्व शेतकर्‍यांना निळवंडेचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, तांभोळ येथे उच्चस्तरीय कालव्याची उपचारी गावाजवळ सात फूट एकदम खोल गेली व लगेच पुन्हा सात फूट वर आणल्याने पाण्याच्या दाबामुळे पाईप वारंवार फुटत आहेत.

सदरच्या पाईपलाईनची पातळी सरळ रेषेत करण्यासाठी पाईपखाली भक्कम आधार उभे करावेत, जागेवर पाईप खोल घालून वर काढल्याने निर्माण झालेला अवरोध दुरुस्त करावा, पाण्याचा विसर्ग मोकळा होईल यासाठी आवश्यक ती सर्व दुरुस्ती करून पाणी अधिकाधिक उंचीवर जाईल याची व्यवस्था करावी, गर्दणी येथे पाईपलाईन जागेवर अनावश्यकरित्या दक्षिण दिशेकडे वळविण्यात आली. याऐवजी पाईपलाईन सरळ पुढे नेऊन उत्तरेकडे नेल्यास अधिक शेतकर्‍यांना लाभ होईल असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. सदरच्या शक्यतेची तांत्रिक बाजू तपासून मूळ पाईपलाईनमध्ये त्यानुसार बदल करावेत, उच्चस्तरीय कालव्यांचे लाभक्षेत्र विस्तारासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध करून द्यावे, निळवंडे पाटात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना जमिनीचा रास्त मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, बाधित शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना नोकरी द्यावी, उच्चस्तरीय कालव्यांच्या न्याय्य सिंचन परिचालनासाठी डाव्या व उजव्या कालव्यांसाठी स्वतंत्र पाणी वाटप संस्थांची स्थापना करावी आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या आंदोलनात शेतकरी नेते डॉ. अजित नवले, डॉ. रवींद्र गोर्डे, शांताराम गजे, सदानंद साबळे आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 17 Today: 1 Total: 117657

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *