शिर्डीत साईमंदिर परिसरातील व्यावसायिकांची कोरोना चाचणी तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासनाचा निर्णय
नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन देखील सतर्क झाले असून विविध उपायोजना करत आहे. साईमंदिर परिसरातील व्यावसायिकांची कोरोना चाचणी शिर्डी नगरपंचायतकडून जागेवरच करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत गर्दी असणार्या शिर्डीतील सर्व व्यावसायिकांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्याचा निर्णय शिर्डी नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल झाले होते. भविकांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या संभाव्य धोक्यामुळे नगरपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक दुकानदार आणि कामगारांची कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोविडचे संकट सुरू आहे. पहिल्या आणि दुसर्या लाटेत अहमदनगर जिल्ह्यात अक्षरशः कहर झाला होता. रुग्णांना वेळेवर खाटा आणि औषधोपचार मिळणेही कठीण झाले होते. अनेकांचा बळी देखील गेला. त्यामुळे तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करण्यात येत आहे. त्यादृष्टीने अत्यंत गर्दी असणार्या साईनगरीतील व्यावसायिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. याकामी नगरपंचायतने पुढाकार घेतला असून, तपासणीत बाधा झाल्याचे आढळून आल्यास तत्काळ उपचारार्थ दाखल करण्यात येत आहे.