दवणगावला शेतकर्‍याची आत्महत्या तर मुलगी पलंगावर मृतावस्थेत आढळली

दवणगावला शेतकर्‍याची आत्महत्या तर मुलगी पलंगावर मृतावस्थेत आढळली
धक्कादायक घटनेने जिल्ह्यात उडाली खळबळ; राहुरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील दवणगाव येथे गुरुवारी (ता.29) मध्यरात्री शेतकर्‍याने घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर त्यांची तीन वर्षांची मुलगी पलंगावर मृतावस्थेत आढळली. या मुलीच्या गळ्यावर लाल व्रण असून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अनिल दिनकर पाळंदे (वय 47, रा. पाळंदे वस्ती, दवणगाव) व आदिरा अनिल पाळंदे (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. मुलीचा मृतदेह अहमदनगर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविला आहे. मृत अनिल यांची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी आंबी स्टोअर येथे गेली आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना मुलगी झाली. घरात अनिल व त्यांची तीन वर्षांची मुलगी एका खोलीत झोपले होते. दुसर्‍या खोलीत अनिल यांचे आई-वडील झोपले होते. शुक्रवारी सकाळी सहा वाजता अनिल यांनी खोलीचा दरवाजा न उघडल्याने आई-वडिलांनी शेजार्‍यांना बोलाविले. त्यावेळी खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत अनिल यांचा तर पलंगावर मुलगी आदिराचा मृतदेह आढळला.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृताचे दोन भाऊ नाशिक येथे राहतात. त्यांना तातडीने बोलाविण्यात आले. मृत आदिराच्या गळ्याजवळ लाल व्रण आहे. त्यामुळे तिचा गळा दाबून खून करून, नंतर अनिल यांनी गळफास घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनिल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरीला पाठविला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे चुलते अनिल यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांचे हातऊसने पैसे घेतलेले होते. ते कर्जबाजारी झाले असल्याने त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी. त्यांचा मुलीवर तर खूप जीव होता. त्यामुळे त्यांनी मुलीचा गळा दाबून खून केला असावा यावर विश्वासच बसत नाही.
– संदीप पाळंदे (मृत अनिल पाळंदे यांचे पुतणे)

Visits: 117 Today: 1 Total: 1419161

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *