भाजपाच्या आंदोलनात घडले गटबाजीचे प्रदर्शन! जुन्या नेत्यांची आंदोलनाकडे पाठ; निवडणुकीतही परिस्थिती बदलण्याची शक्यता कमी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या हिंदू स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत स्थानिक भारतीय जनता पार्टीने त्या विरोधात आंदोलन पुकारले होते. दोन दिवस चाललेल्या या आंदोलनाची परिणीती मुख्याधिकार्यांच्या लेखी आश्वासनात झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मिळालेले हे यश मोठे असल्याचेही मानले गेले. मात्र त्याचवेळी या आंदोलनातून भाजपातील अंतर्गत गटबाजीही दिसून आली. एकीकडे पदाधिकार्यांकडून निवडणुकांची रणनीती निश्चित केली जात असताना दुसरीकडे भाजपातील एक मोठा गट मात्र या आंदोलनापासून दूरच राहिला. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाकडे ज्वलंत मुद्दे असूनही गटबाजीतून त्यांना कितपत यश मिळेल याबाबत मात्र साशंकता निर्माण झाली आहे.

सन 2019 साली पालिकेने स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत संगमनेरकरांसाठी एकमेव असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी 63 लाख 19 हजार 733 रुपयांची निविदा काढली होती. या निधीतून स्मशानातील अपेक्षित असलेले सुशोभीकरणाचे काम पूर्णही झाले. मात्र आश्चर्य म्हणजे अवघ्या दोन वर्षात पुन्हा त्याच कामांसाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने 33 लाख 99 हजार 969 रुपयांच्या दोन निविदा सूचना पुन्हा प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली. पालिकेच्यावतीने जी कामे पूर्ण झाली आहेत, त्याच कामांसाठी पुन्हा निविदा निघाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना एकप्रकारे आयती संधीच प्राप्त झाली. त्यामुळे या निविदांचा विषय घेवून भाजपाने गेल्या मंगळवारी (ता.28) पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच मांडव घालीत साखळी उपोषणास सुरुवात केली.

दोन दिवस चाललेल्या या आंदोलनादरम्यान काही नाट्यमय घडामोडीही घडल्या. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी थेट आंदोलकांशी संवाद साधून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी निविदा प्रसिद्ध झाली असली तरीही संबंधित ठेकेदाराला कोणतीही रक्कम अदा केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र हा मुद्दा ज्वलंत असल्याने आणि प्रत्येक संगमनेरकराशी निगडीत असल्याने भाजपाला कोणत्याही स्थितीत त्यापासून दूर जाण्याची इच्छा नव्हती. त्याप्रमाणे मंगळवारच्या आंदोलनानंतर बुधवारी (ता.29) या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेत भाजपाच्या पदाधिकार्यांनी पालिकेचे गेटबंद करण्याचा इशारा दिला.

त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच पालिकेच्या परिसरात पोलिसांचा वावर वाढला. ऐनवेळी आंदोलकांना अटक करण्याची वेळ आलीच तर त्यासाठी पोलिसांनी व्हॅनचीही सोय केली. त्याचा परिणाम आंदोलकांनी गेटबंद करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा विचार सोडून देत समूहाने जात थेट मुख्याधिकार्यांचे दालन गाठले. तेथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी, पद्य गायनाचा कार्यक्रम राबवित वातावरण निर्मितीही केली गेली. सरतेशेवटी मुख्याधिकार्यांनी शहर अभियंत्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या काही वर्षांत भाजाकडून झालेल्या आंदोलनातील हे एक यशस्वी आंदोलन मानून त्यात सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आपली पाठही थोपटून घेतली व कोणत्याही ठोस कारवाईशिवाय या आंदोलनाची सांगता झाली.

खरेतर कधीकाळी पालिकेच्या सभागृहात दबदबा असलेल्या भारतीय जनता पार्टीला राज्यात सत्तेवर असूनही 2016 साली फारसे काही करता आले नाही. त्यातच प्रत्येक निवडणुकीत भाजपातील अंतर्गत गटबाजी उफाळून बाहेर पडल्याने त्याचे नकारात्मक परिणामही समोर आले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत तर केवळ पर्याय नसल्याने झालेल्या मतविभाजनातून भाजपाच्या मेघा भगत या प्रभाग 11 मधून विजयी झाल्या. पालिकेच्या 28 सदस्यसंख्येत भाजपाकडून निवडून गेलेल्या त्या एकमेव प्रतिनिधीही ठरल्या. त्याच निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत राधावल्लभ कासट यांच्या पराभवामागेही अंतर्गत गटबाजी हे एक प्रमुख कारण ठरले. मात्र तरीही त्यातून कोणताही बोध घेतला नाही.

आता या सर्व घडामोडींना पाच वर्षांचा काळ लोटला आहे, मात्र तरीही भाजपाच्या गटबाजीत कोणताही बदल झाल्याचे दिसून येत नाही. त्यावेळी झालेली आंदोलने असतील किंवा प्रत्यक्ष निवडणुक त्यावर त्यावेळी शहराध्यक्ष पदावर असलेल्या राजेंद्र सांगळे आणि पर्यायाने भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व श्याम जाजू यांचे बंधू राम यांचाच वरचष्मा दिसून आला होता. त्यांच्या
उपक्रमात आजच्या भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्ते अभावानेच दृष्टीस पडत होते. तशीच स्थिती आजही कायम असून संघटनात्मक बदलांनंतर शहराध्यक्षपदी निवड झालेले अॅड.श्रीराम गणपुले व त्यांच्या सहकार्यांना वगळून मागील पदाधिकार्यांनी या आंदोलनापासूनच स्वतःला वेगळेच ठेवल्याचेही अगदी स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे पालिकेतील सत्ताधार्यांविरोधात ज्वलंत विषय हाती लागल्यानंतर तो भाजत ठेवल्यास त्याचा थोडाफार फायदा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाही पुन्हा एकदा भाजपातील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे दिसल्याने आगामी निवडणुकीतही त्याचे प्रतिबिंब दिसण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने या आंदोलनाचे यश भाजपासाठी किती सकारात्मक होईल याबाबत मात्र साशंकता कायम आहे.

संगमनेर नगरपरिषदेवर गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसचा झेंडा आहे. या प्रदीर्घ कालावधीत अनेकवेळा विरोधकांच्या हाती ज्वलंत विषय लागले आहेत. मात्र ते भाजण्यात आणि निवडणुकीत त्याचा फायदा मिळवण्यात प्रत्येकवेळी विरोधक अपयशीच ठरल्याचा इतिहास आहे. यावेळीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरधामच्या नावाने निघालेल्या निविदांचा ज्वलंत विषय समोर येवूनही त्या माध्यमातून भाजपाला विस्कटलेले बळ एकवटण्यात अपयशच आल्याने पुन्हा एकदा गटबाजीचे दर्शन घडले आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत जिरवाजिरवीचेच चित्र दिसण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

