संगमनेरच्या नेतृत्वाला टीकेचे लक्ष करणे अयोग्य ः नवले निळवंडे पाणी प्रश्न पेटला; पुढार्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
नायक वृत्तसेवा, अकोले
माजी मंत्री मधुकर पिचड व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पाटपाणी प्रश्नी मोठे योगदान आहे. अकोले तालुक्याने संघर्षातून उत्कर्ष साधला आहे. त्यासाठी संगमनेरने सतत साथ दिली असून संगमनेरच्या नेतृत्वाला टीकेचे लक्ष करणे योग्य नाही. आम्ही आजपर्यंत कधीही कुणाचे कान फुंकले नाहीत. अकोले तालुक्यातील नवीन नेत्यांनी भूतकाळ समजून घेण्याची गरज आहे, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी विरोधकांना लगावला.
निळवंडेच्या उजव्या उच्चस्तरीय कालव्याच्या प्रश्नी अकोले तालुक्यातील प्रवरा खोर्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करावे यांसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्यने शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने महामोर्चात महिनाभरात जलसेतूचे काम मार्गी न लागल्यास जलसेतूला अडथळा ठरणारी पाईपलाईन शेतकरी उखडून फेकून देतील असा इशारा आमदार डॉ.किरण लहामटे यांच्यासह आंदोलकांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवले बोलत होते. ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, मंदा नवले, मीनानाथ पांडे, संभाजी वाकचौरे, शिवाजी नेहे, विक्रम नवले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ज्येष्ठ नेते मधुकर नवले म्हणाले, काँग्रेस पक्ष कायम शेतकरी आणि कामगारांच्या बाजूचा पक्ष असून तालुक्याच्या विकासाबाबत आम्ही नेहमी जागरूक असतो. आम्ही आजपर्यंत पाटपाण्याच्या प्रश्नाला अग्रक्रम दिला असून पाण्यावर आमचा अधिकारच आहे. पाटपाणी हा समृद्धीचा मूळ पाया आहे. त्या प्रश्नांवर एक नाद, एक सूर, एक ताल असायला हवा. त्यासाठी निर्मळ राजकारण करावे, त्यात राजकारण करू नये.
पाटपाण्याची चळवळ अजून अपूर्ण आहे, अजून बिनी मारण्याची शिल्लक आहे. यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांना आम्ही श्रेय देतो. त्यात आम्हांला काही कमीपणा वाटत नाही. जोपर्यंत उजव्या भागाला पाणी नाही, तोपर्यंत पाणी प्रश्न सुटला असे म्हणता येणार नाही. वरील सर्व भाग हा खरीपावर अवलंबून आहे. त्या भागातील शेतकर्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. पण कालच्या आंदोलनात आम्हांला जाणीवपूर्वक निमंत्रण दिले नाही तरी आम्ही या प्रश्नाबाबत कायम शेतकरी वर्गासोबत आहोत. स्वातंत्र्यानंतर अकोले तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी सर्वांना बरोबर घेऊन चळवळी केल्या. माजी मंत्री पिचड यांनी पाटपाण्याच्या चळवळी सर्वांना घेऊन केल्या. मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी सर्वांना घेऊन जात नाही. यापुढे त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करावे. तालुक्यातील प्रश्नांबाबत आमदारांनी रस्त्यावर आलेच पाहिजे ते त्यांचे कर्त्यव्यच आहे. त्यांनी सर्वांशी संवाद ठेवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कालव्याच्या तांत्रिक बाबी समजून सांगत कालव्याबाबत शंका घेणे चुकीचे आहे. फक्त जलसेतूसाठी संगमनेरला जाणार्या पाण्याचा पाईपलाईनची अडचण नसून त्याबरोबरच अकोले 32 गाव योजनेची पाईपलाईन काढावी लागणार आहे. यापुढे आम्ही स्वतः दबाव आणून काम तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहे. कालव्याच्या वरच्या भागासाठी पाणी मिळण्यासाठी डोंगर पायथ्याशी पाणी नेणे गरजेचे आहे, ते पाणी वर उचलून टाकण्यासाठी उपसा जलसिंचन योजना करावी लागणार आहेत, असे मीनानाथ पांडे म्हणाले. प्रास्ताविक व स्वागत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणिस शिवाजी नेहे यांनी केले. तर आभार युवा नेते विक्रम नवले यांनी मानले.