धांदरफळमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू
धांदरफळमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील धांदरफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेविषयी अधिक माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.व्ही.लोहारे म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. 15 सप्टेंबरपासून यास प्रारंभ झाला असून 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. सदर मोहीम दोन टप्प्यांत असून पहिला टप्पा पंधरा दिवसांचा आहे. तर दुसरा टप्पा दहा दिवसांचा आहे. या मोहिमेत परिसरातील चौदा गावांसाठी लोकसंख्येनुसार 14 पथके तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक पथकात एक आरोग्यसेवक, एक स्वयंसेवक आणि एक आशासेविकेचा समावेश आहे. हे पथक प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक व्यक्तीचे तापमान, ऑक्सिजन पातळी आदी तपासणार आहेत. लक्षणे दिसल्यास अथवा संशयित आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. याचबरोबर इतर आजारांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ.लोहारे यांनी सांगितले.