संगमनेरच्या कुख्यात गांजा तस्कर महिलेवर पुन्हा छापा! मुख्य तस्कर सीमा पंचारियासह दोघे फरार; नऊ लाख रुपयांचा गांजा जप्त..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भ्रष्ट यंत्रणेचा आधार घेवून वारंवार कोलमडूनही शहरातील अवैध धंदे पुन्हा जोमाने उभे रहात असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत असाच प्रकार उघड झाला असून कुख्यात गांजा तस्कर असलेल्या सीमा पंचारिया या महिलेने कासारवाडीतील आपला पारंपरिक ‘अड्डा’ बदलून पुन्हा जोमाने गांजा तस्करी सुरु केल्याचे समोर आले आहे. या कारवाईत तब्बल 9 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असला तरीही मुख्य आरोपी महिलेसह तिचा जोडीदार मात्र घटनास्थळावरुन पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर ‘एनडीपीएस’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने शहरातील गांजा तस्करी जोमात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह पोलीस पथक घेवून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर खुर्दमध्ये छापा घातला. पोलीस आपल्या अड्ड्यावर येत असल्याचे पाहून अवघ्या जिल्ह्यात कुप्रसिद्ध असलेल्या गांजा तस्कर सीमा राजू पंचारियासह तिचा जोडीदार राजू चव्हाण अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पहाटेपर्यंत आसपासचा संपूर्ण परिसर अक्षरशः पिंजून काढला, मात्र पोलिसांना हुलकावणी देण्यात माहीर असलेली ही तस्कर महिला आणि तिचा जोडीदार पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
यावेळी सीमा पंचारिया या नामचीन गांजा तस्कर महिलेने संगमनेर खुर्दमधील एका घरात तीन गोण्यांमध्ये दडवून ठेवलेला 46 किलो 425 ग्रॅम वजनाचा गांजा, 250 रुपये किंमतीचा वजन काटा व गांजा विक्रीसाठी वापरल्या जाणार्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असा एकूण 9 लाख 30 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी पो.कॉ.विजय पवार यांच्या फिर्यादीवरुन कुख्यात गांजा तस्कर सीमा पंचारियासह तिचा जोडीदार राजू चव्हाण या दोघांवर अंमली व औषधी द्रव्य, मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क) सह 20 (ब)(2)(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला.
सीमा राजू पंचारिया ही महिला संपूर्ण जिल्ह्याला गांजा तस्कर म्हणून परिचयाची आहे. संगमनेर नजीकच्या कासारवाडी शिवारात राहणार्या या महिलेवर यापूर्वी केवळ संगमनेरच नव्हेतर अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेसह ठाणे पोलिसांनीही कारवाया केल्या आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी आपल्या पाच साथीदारांसह एका अलिशान वाहनातून थेट आंध्रप्रदेशातून गांजा घेवून येत असतांना पहाटेच्या सुमारास अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी तिला पकडले होते. या कारवाईत पोलिसांना जवळपास एक कोटी रुपयांचा गांजा हस्तगत झाला होता. त्यावेळी पोलीस कोठडीत असतांना या तस्करांशी ‘अर्थपूर्ण’ संबंधाच्या कारणावरुन कोतवालीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निलंबितही करण्यात आले होते.
त्या प्रकरणातून जामिनावर सुटका झाल्यानंतर तिचे उद्योग पुन्हा सुरुही झाले आणि कारवायांचे फार्सही राबविले गेले. दोन वर्षांपूर्वी मालदाड रोडवर झालेल्या कारवाईतूनही तिच्या सहभागी चर्चा समोर आली होती. दशकभरापूर्वी जिल्ह्यातील गांजा तस्करीचे केंद्र म्हणून कोल्हारचा उल्लेख व्हायचा. मात्र जिल्हा पोलिसांनी तेथील तस्करीच्या अड्ड्यांना खणत्या लावल्यानंतर गांजा तस्करीत निर्माण झालेली पोकळी संगमनेरच्या याच सीमा राजू पंचारियाने भरुन काढली आणि जिल्ह्यातील बहुतेक सर्व भागात गांजा पुरवठा करणारी तस्कर म्हणून नावारुपाला आली. त्यातूनच तिच्यावर वेळोवेळी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हेही दाखल आहेत. मात्र त्यामुळे तिच्या तस्करीत कोणताही बदल झालेला नसून दिवसोंदिवस त्यात वाढ होत असल्याचेच समोर येत आहे. शुक्रवारी संगमनेर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने जिल्ह्यातील गांजा तस्करीला धक्का बसला असला तरीही तो किती काळ जाणवेल याची कोणतीही शाश्वती नाही.
दैनिक नायकला मिळालेल्या ‘विश्वसनीय’ माहितीनुसार सदरची कारवाई शुक्रवारी (ता.1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाली. मात्र त्याबाबत गुन्ह्याची नोंद मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली सीमा पंचारिया ही मूळची कासारवाडीतील रहिवासी आहे. पोलिसांनी मात्र संगमनेर खुर्दमधून तिच्या घरातूनच गांजा जप्त केल्याचे म्हंटले आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणी कारवाई करुन सदरचा गांजा जप्त केला ते ठिकाण एका राजकीय पक्षाच्या संबंधित महिलेच्या भावाचे असून त्याचा मात्र या गुन्ह्यात कोठेही उल्लेख नसल्याची चर्चाही या कारवाईनंतर परिसरात सुरु आहे. या घडामोडींवरुन शहर पोलिसांच्या या कारवाईबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.