पिंपरी लोकाई येथे ड्रोनद्वारे पिकांवर हवाई फवारणी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे प्रात्यक्षिकातून शेतकर्यांना मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, राहाता
ड्रोनद्वारे पिकांवर हवाई फवारणीतून वेळ, पैसा श्रम आणि पाण्याची मोठी बचत होते हाच संदेश कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरने राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई येथील शेतकर्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिला आहे.

शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान नेहमीच वापरले जाते. सध्या ड्रोनद्वारे फवारणी तंत्र फायदेशीर ठरत आहे. याविषयी शेतकर्यांना माहिती मिळावी या हेतूने पिंपरी लोकाई येथे कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर अंतर्गत संचालित हवामानावर आधारित शाश्वत कोरडवाहू शेती प्रकल्प (निक्रा) अंतर्गत हे प्रात्यक्षिक झाले. यावेळी पाच शेतकर्यांच्या हरभरा, गहू, कांदा पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. केंद्राचे कृषी विद्या विभागाचे शैलेश देशमुख यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना सांगितले की, ड्रोनद्वारे एकरी 10 लिटर पाणी वापरून फवारणी करता येते. कीटकनाशक, बुरशी नाशकांची फवारणी करता येते. एक एकर फवारणीसाठी केवळ पाच मिनिटे लागतात. या तंत्राचा फायदा विशेषत: ऊस, मका, गहू यांसह मोठ्या फळबागेला प्रभावीपणे होतो. याचा वापर शेतकर्यांनी करावा, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दंवगे, शांताराम सोनवणे, डॉ. विठ्ठल विखे, अनुराधा वांढेकर यांच्यासह प्रकल्पातील समाविष्ट शेतकरी उपस्थित होते.
