‘बेफाम’ वाळुतस्कराच्या ट्रॅक्टरची चाके पुन्हा ‘रक्ताने’ माखली! अडीच वर्षीय बालकाचा चिरडून मृत्यू; संतप्त जमावाचा दोन तास रुग्णालयात ठिय्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर आणि वाळु तस्करी हे सूत्र आता नवीन राहीले नसून राजकीय आशीर्वादाचे पाठबळ मिळालेल्या वाळु तस्करांची मुजोरी वाढल्याने ते बेफाम झाले आहेत. त्याचा परिणाम रहिवासी भागातूनही भरदिवसा सुसाट वेगाने वाळु तस्करांची वाहने धावत असून सर्वसामान्य माणसांच्या जीवाला कोणी वाली नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत वाळु तस्करांच्या भरधाव वाहनांच्या धडका बसून पादचारी जखमी होण्याच्या घटना घडल्या असतांना आता रविवारी सुसाट वेगाने भरवस्तीतून धावणार्‍या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसून एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा बळी गेला आहे. या संतापजक घटनेत त्याच्या पित्यासह सात वर्षांचा मुलगाही जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने जवळपास दोन तास पालिकेच्या शवविच्छेदनगृहात ठिय्या दिला होता. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी जमावाची समजूत काढल्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास ‘त्या’ चिमुकल्याचा शोकाकूल वातावरणात दफनविधी करण्यात आला.


याबाबत शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची रविवारी (ता.26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरानजीकच्या कोल्हेवाडी रस्त्यावर घडली. या परिसरात राहणारे इब्राहिम मुनीर शेख हे मोहमंद (वय अडीच वर्ष) व अबुहुरेरा (वय 7 वर्ष) या दोन्ही मुलांना घेवून आपल्या दुचाकीवर (क्र.एम.एच.14/बी.आर.2584) सय्यदबाबा चौक येथे दुध आणण्यासाठी जात होत होते. यावेळी कोल्हेवाडीच्या दिशेने संगमनेरकडे पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरने (क्र.एम.एच.17/ए.ई.2756) ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने ते तिघेही वाहनासह खाली कोसळले. यावेळी पुढे बसलेला अडीच वर्षाचा मोहंमद हा चिमुरडा ट्रॅक्टरच्या पुढील चाकाखाली सापडल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ अबुहुरेरा आणि वडील दोघेही जखमी झाले. या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक मंगेश मारुती शितोळे (रा.संगमनेर खुर्द) हा ट्रॅक्टर तेथेच सोडून पळून गेला. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने अडीच वर्षाच्या मोहंमदचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला. परिसरातील नागरिकांनी जखमी असलेल्या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले, तर मयत झालेल्या बालकास पालिकेच्या शवविच्छेदनगृहात आणण्यात आले. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाल्याने तणावही निर्माण झाला होता. मयत बालकाच्या संतप्त नातेवाईकांनी यावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त करतांना जो पर्यंत जबाबदार अधिकारी येणार नाही तो पर्यंत बालकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. जसजशी रात्र होत होती, तसतसा जमावाचा संतापही अनावर होत असल्याने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक पंकज शिंदे व पो.कॉ.सचिन उगले यांनी त्यांची समजूत काढीत दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मुस्लिम समाजातील काही ज्येष्ठांनीही समजूतदारीची भूमिका घेतल्याने रात्री साडेबाराच्या सुमारास त्या इवल्याशा जीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


गेल्या महिन्यात कासारवाडी शिवारात एका पादचार्‍याला धडक देवून वाळु तस्कर ट्रॅक्टरसह पसार होण्याची घटना घडल्यानंतर त्याबाबत चर्चा सुरु असतांनाच साळीवाड्यातील राज फोटो स्टुडिओसमोर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाच्या दुचाकीला धडक देवून त्याला रक्तबंबाळ अवस्थेत तसेच सोडून वाळु तस्कर पसार होण्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांमध्ये अपघातात जखमी झालेल्यांचे दैव बलवत्तर होते म्हणून त्यांना तत्काळ आसपासच्या नागरिकांनी रुग्णालयात दाखल केल्याने ते बचावले, मात्र रविवारच्या घटनेत दुचाकीला धडक बसल्यानंतर पुढे बसलेला चिमुकला थेट भरधाव ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मयत बालकाचे वडील इब्राहिम मुनीर शेख (वय 36, रा.इकरानगर, कोल्हेवाडी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी ट्रॅक्टरचालक मंगेश शितोळे याच्यासह ट्रॅक्टरचा मालक शफीक एजाज शेख (रा.लखमीपूरा) या दोघांविरोधात विरोधात भा.द.वी.कलम 304 (अ), 279, 337, 338 सह मोटर वाहन कायद्याचे कलम 134 (अ)(ब), 177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 


वाळु तस्करांच्या बेफाम ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याची रविवारची पहिली घटना नाही. यापूर्वीही शहरानजीकच्या कासारवाडी शिवारात सकाळच्यावेळी फिरायला गेलेल्या एका तरुणाला तर काही दिवसांपूर्वी पहाटे दोनच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन घराकडे निघालेल्या घुलेवाडीच्या तरुणाला धडक देवून सुसाट वेगाने पसार होण्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांची पोलीस दप्तरी नोंद झाली असली तरीही त्यातून या घटना मात्र थांबल्या नसून वाळु तस्करांच्या बेफाम ट्रॅक्टरच्या चाकांना सर्वसामान्याचे रक्त माखण्याचे प्रकार सुरुच आहेत. दुर्दैवाने रविवारच्या घटनेत अवघ्या अडीच वर्षाच्या बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

Visits: 193 Today: 3 Total: 1103219

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *