कोल्हार – घोटी मार्गाचे काम वेळेसह दर्जेदार करा ः थेटे अकोलेत ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांनी वाचला तक्रारींचा पाढा
नायक वृत्तसेवा, अकोले
मुंबईला जोडणार्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ते अतिशय संथ गतीने आणि निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. हा प्रकार नागरिकांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देताच अकोल्याचे तहसीलदार सतीष थेटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना करत काम दर्जेदार करण्यास सांगितले.
अकोले तहसिल कार्यालयात शुक्रवारी (ता.24) 35 वा ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यात प्रामुख्याने कोल्हार-घोटी मार्ग, 32 गाव पाणी पुरवठा योजना, शहरातील वाहतूक कोंडी, महात्मा फुले चौकातील रहदारी अशा विविध विषयांवर चर्चा झाली. याचबरोबर भंडारदरा धरणाचे पुर्नवसन झालेल्या काही शेतकर्यांची नावे अजूनही उतार्यावर आलेली नाहीत. यावर तत्काळ कार्यवाही होऊन शेतकर्यांना त्यांचा हक्क प्रदान करावा. तसेच धरण परिसरात येणार्या पर्यटकांची होणारी लूट थांबवून पर्यटन विकासाच्या दृष्टीकोनातून कामे करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली.
शहरातील भारतीय स्टेट बँकेचे अधिकारीव कर्मचारी ग्राहकांना योग्य मार्गदर्शन व सेवा देत नसल्याची खंत काही ग्राहकांनी व्यक्ती केली. तर खादी ग्रामोद्योग अंतर्गत बेरोजगारांसाठीची अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवून बँक त्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडते. तसेच शेतकर्यांना कर्ज पुरवठा करताना तो योग्य वेळेत होत नसल्याकारणाने मोठे नुकसान होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. रब्बी हंगाम सुरू होताच महावितरणने शेतकर्यांच्या विहिरीसाठी जोडणी असणारी रोहित्रे बंद करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
शासन धोरणानुसार संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावातील. पुरवठा विभाग, आधार केंद्र, सेतू, आरोग्य, कृषी विभाग यांच्या तक्रारी, शैक्षणिक शुल्क, कारखाना रस्त्यावरुन उडणारी धूळ, मोलॅसिसचे टँकर आदी अनेक तक्रारींचा पाढा ग्राहकांनी वाचला. याप्रसंगी ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, कार्याध्यक्ष महेश नवले, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, निवृत्त प्राध्यापक डॉ. सुनील शिंदे, शांताराम गजे, राजेंद्र घायवट, माधव तिटमे, रामदास पांडे, रामहरी तिकांडे, शारदा शिंगाडे, ज्ञानेश्वर पुंडे, सुनील देशमुख, दत्ता ताजणे, शेखर भरीतकर, रामदास पवार, हरिभाऊ अस्वले, संदीप शेणकर, बाळासाहेब वाकचौरे, कैलास तळेकर, कैलास आरोटे, नाना चौधरी यांच्यासह महावितरणचे उप कार्यकारी अभियंता बागुल, पंचायत समितीचे एस. डी. कोष्टी, सार्वजनिक बांधकामचे जी. एस. शेळके, दुय्यम निबंधक कि. का. झांबरे, पुरवठा निरीक्षक एस. एस. थाटकर, सुनील बुळे आदी उपस्थित होते.