वीरभद्र मंदीर चोरी प्रकरणी मुस्लीम बांधवांचे पोलिसांना निवेदन
वीरभद्र मंदीर चोरी प्रकरणी मुस्लीम बांधवांचे पोलिसांना निवेदन
नायक वृत्तसेवा, राहाता
राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरातील दागिने चोरी प्रकरणी जलद तपास लावावा, अज्ञात चोरांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा राहाता व परिसरातील मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुस्लिम बांधवांनी नुकताच पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज हे सर्व जाती-धर्माचे श्रद्धास्थान असलेले पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी देवाचा चांदीचा मुकूट, चांदीचे कासव व इतर दागिने चोरून नेले असून हे चोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असतानाही संबंधितांचा अजून तपास लागलेला नाही. या चोरीचा तपास त्वरीत लावून संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली आहे. सदन निवेदनावर अन्वर शेख, इलियास शहा, पत्रकार मुस्ताक शहा, अन्वर अमीर शेख, समीर शेख, अझहर शेख, सुलेमान शेख, शकील इनामदार, नसीर इनामदार, इफ्तीहार शेख, सलीम सय्यद, रफीक शेख, मुन्ना शहा आदिंच्या सह्या आहेत.

