सकाळी भाजपमध्ये तर संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश! कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवाराची राज्यभर चर्चा

नायक वृत्तसेवा, नगर
कर्जत नगरपंचायतीची निवडणूक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या फाटाफुटीसाठीच गाजत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या प्रमुख उमेदवारांनीच ऐनवेळी माघार घेतल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. असाच आणखी एक प्रकार शुक्रवारी (ता.17) समोर आला. भाजपच्या एका उमेदवारासाठी सकाळी प्रचार बैठक झाली. मात्र, सायंकाळी याच उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपचे नेते आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.

कर्जत नगरपंचायतीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादीकडून मोठे नेते आणि मंत्र्यांच्या सभा होत आहेत. तर भाजपकडून खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शिंदे हेच प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. शुक्रवारी सकाळी प्रभाग क्रमांक 14 मधील भाजपच्या उमेदवार शिबा तारेक सय्यद यांच्यासाठी कोपरा सभा घेण्यात आली. सकाळी 11 वाजता झालेल्या या सभेला खासदार डॉ. सुजय विखे आणि प्रा. राम शिंदे उपस्थित होते. दोघांनी सय्यद यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता याच सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांची शुक्रवारी सभा झाली. या सभेच्यावेळी नेत्यांच्या उपस्थितीत सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची माहिती देणारा सय्यद यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घडामोडीनंतर माजी मंत्री शिंदे यांनी पुन्हा आमदार पवार यांच्यावर टीका केली आहे. सकाळची कोपरा सभा आणि त्यानंतर सायंकाळी सय्यद यांनी केलेला राष्ट्रवादीत प्रवेश यांची छायाचित्र ट्वीट करून शिंदे यांनी कर्जत-जामखेडचे विद्यमान आमदार यांचे हेच विकासाचे राजकारण का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून भाजपला मिळालेला हा पहिलाच धक्का नाही. निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नवख्या उमेदवारांना सोबत घेऊन शिंदे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. एवढ्यावरच न थांबता भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निव़डून आले. त्यामुळे शिंदे यांनी आक्रमक होत प्रथम ठिय्या आणि मौन आंदोलन केले. त्यानंतर मूक मोर्चाही काढला. आमदार रोहित पवार दडपशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आता मतदानाला थोडेच दिवस शिल्लक असतानाही भाजपमधून राष्ट्रवादीत जाण्याचे प्रकार सुरूच आहेत.

Visits: 97 Today: 1 Total: 1100521

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *