आगामी निवडणुकांपूर्वी अकोल्यात शिवसेनेला धक्का बसणार? शिवसेनेतील अनेक पदाधिकारी दुसर्या पक्षात जाण्याची शक्यता

नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय परिस्थिती पाहून इच्छुक उमेदवार आपला पक्ष निवडू लागले आहेत. अकोले तालुक्यातील असा पहिला धक्का शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील काहीजण दुसर्या पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे. अकोले तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप सुरू झाले आहेत. युवा नेते सतीश भांगरे पुन्हा स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

शिवसेनेचे अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य शिवबंधन तोडण्याच्या तयारीत आहेत. काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काही नेते काँग्रेस पक्षात जाणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना पक्षातून अनेक नेते बाहेर पडणार असल्याची खात्रीलायक चर्चा सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने सतीश भांगरे सध्या चर्चेत आहेत. विविध पदावर काम करत असताना पक्षातील पदाधिकारी यांच्याकडून सहकार्य न होता कायमच त्रासदायक अशी भूमिका घेत खच्चीकरण केल्याची भावना निर्माण झाल्यावर हे लोक खासगीत बोलत आहेत. तर शिवसेनेतील पाच लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा सध्या चर्चा जोरात सुरु आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने सतीश भांगरे यांचे बॅनर अकोले शहरात लावले गेले होते. मात्र या बॅनरवर थोरात वगळता कोणत्याही नेत्याचा फोटो दिसून आला नाही. तसेच त्यांच्या गाडीच्या पाठीमागे असलेला शिवसेना पक्षाचा लोगोही त्यांनी काढून घेतला आहे. या कारणाने युवा नेते सतीश भांगरे हे पक्ष सोडतील असा अंदाज वर्तवला जात आहे. दराडे, मेंगाळ यांना ही पक्ष तालुका पदाधकारी कोणत्याही विषयामध्ये विश्वासात घेत नसून अनेक बैठकांना त्यांना पक्षीय कार्यक्रमाचे निमंत्रण देताना टाळले जाते, हे टाळणेच त्यांना वारंवार खटकत आहे. याविषयी जिल्हा व राज्याच्या नेत्यांकडेही अनेकद नाराजी सष्ट केली असून तरी कोणतेही बद्दल होत नसल्याने अखेर कंटाळून या सर्वांनी पक्ष सोडण्याचा विचार केल्याचे दिसते.

सतीश भांगरे हे अनेक दिवसांपासून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असुन अनेक भेटीगाठी झाल्याची चर्चा आहेत. त्यांचा राजकीय प्रवेश काँग्रेस पक्षातून झाला होता. आज पुन्हा ते काँग्रेस पक्षात येत असल्याने ते स्वगृही येत असल्याचे अकोले काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यामुळे अकोले तालुक्यात राजकीय भूकंप होणार हे निश्चित झाले आहे.
