सलग तिसर्या वर्षी डांगी जनावरांचे प्रदर्शन बंद
नायक वृत्तसेवा, राजूर
दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणारे देशी-विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले असल्याची माहिती प्रशासक दिनकर बंड आणि ग्रामविकास अधिकारी बी. डी. नाडेकर यांनी दिली आहे.
सलग तीन वर्षे हे प्रदर्शन बंद असल्याने शेतकर्यांच्या सर्जा-राजाच्या खरेदी-विक्री बरोबरच कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत, पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी-विदेशी जनावरांचे, कृषी मालाचे प्रदर्शन भरत असते. या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी, संगमनेर, जुन्नर, सिन्नर आदी तालुक्यांतून हजारो जनावरांची खरेदी-विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात. अहमदनगर, नाशिक, मालेगाव, सटाणा, औरंगाबाद आदी ठिकाणांहून जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापारी येथे दाखल होत असतात. सलग चार दिवस चालणार्या या प्रदर्शनात हजारो नागरिक आपली उपस्थिती लावत असतात. विविध व्यावसायिक आपली दुकाने यात मांडत असतात. या सर्व माध्यमातून या प्रदर्शनात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे प्रदर्शन रद्द करण्यात आले होते. यावर्षी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असल्याने प्रदर्शन भरणार याबाबत शेतकरी आशावादी होते. मात्र यावर्षीही प्रदर्शन रद्द करण्यात आल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.