‘ताई, ही निवडणूक जनतेची नव्हती, तर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची’! भाजप नेत्या चित्रा वाघ यांना काँग्रेसचे सत्यजीत तांबेंनी ट्विटरच्या माध्यमातून हाणला टोला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांनी त्यात जनतेचा उल्लेख केला. त्यावर अनेकांनी आक्षेप घेत ही विधान परिषदेची निवडणूक असल्याची आठवण त्यांना करून दिली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी चित्रा वाघ यांना ट्विटरच्या माध्यमातून टोला हाणला आहे.

विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. निकालानंतर भाजपच्या गोटातून आनंदोत्सव साजरा झाला. विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना महाविकास आघाडीवर टीका करण्याची संधी साधली. त्यांनी म्हटले आहे, ‘मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री सर्व सरकारी यंत्रणा तिघाडीची असूनही जनतेनं भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांच्या बाजूनं कौल दिला. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. या निकालाचा अर्थ शिवसेनेचा बाण भरकटलाय, घड्याळाचं टाईमिंग चुकलंय, जनतेनं काँग्रेसची साथ सोडलीय.’

चित्रा वाघ यांच्या ट्विटला टॅग करून सत्यजीत तांबे यांनी ट्विट केलं आहे. ‘ताई, ही निवडणूक जनतेची नव्हती, तर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची होती. माहितीस्तव सादर,’ असं म्हटलं आहे. अद्यापही भाजप आणि विरोधकांमध्ये टीका-टिप्पणी सुरू आहेत. दरम्यान, सहा जागांपैकी भाजपने तब्बल चार जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 27358

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *