पिकअप चालकाविरोधात सदोष मनुष्यवध म्हाळुंगी पुलावरील अपघात; महिलेचा मृत्यू दोघे गंभीर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीला पाठीमागून धडक देत झालेल्या भीषण अपघातात महिलेचा जागीचा मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात २६ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत मयत महिलेचा पती व मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मयतेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन जुन्नर तालुयातील पिकअप चालकाविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी (ता.२६) पुणे-नाशिक बायपास महामार्गावरील म्हाळुंगी नदीच्या पुलावर घडली होती. या घटनेत चंद्रकांत खराडकर हे पत्नी वैष्णवी उर्फ रोहिणी व मुलगा शुभ यांच्यासह बजाज कंपनीच्या सीटी १०० (क्र.एम.एच.१७/बी.टी.३६१६) वरुन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप जीपने (क्र.एम.एच.१४/के.ए.७३३४) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पाठीमागे बसलेल्या वैष्णवी खराडकर या दुचाकीवरुन उडून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोयाला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत खराडकर आणि त्यांचा मुलगा शुभ यांना आसपासच्या नागरीकांनी संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या दोघांवरही उपचार सुरु असून त्यांची स्थिती गंभीर आहे. याप्रकरणी रविवारी (ता.१) सायंकाळी उशिराने मयत वैष्णवी खराडकर यांचे बंधू अश्विनीकुमार बेल्हेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी पिकअपचा चालक सतीष संदीप डोंगरे (रा.पांगरी माथा, ता.जुन्नर) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या कलम ३०४ (अ) सह भारतीय दंडसंहितेचे कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.

Visits: 88 Today: 2 Total: 1113706

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *