शिर्डी लोकसभेच्या रणांगणात ‘मनसे’ची एन्ट्री! महायुतीत समावेशाची शक्यता; बाळा नांदगावकरांच्या नावाची चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाकडून काही क्षणांतच तारखांची घोषणा होणार आहे. देशासह राज्यातही जागा वाटपावरुन राजकीय पक्षांच्या वाटाघाटी सुरुच आहेत. अशातच शिवसेना व राष्ट्रवादीच्या फूटीर गटासह सत्ता स्थापन करणार्या भाजपलाही अद्याप वाटपाचे सूत्र ठरवता आलेले नाही. अशा स्थितीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही महायुतीमध्ये घेण्याच्या चर्चा सुरु झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने आपल्या वाट्यातील 20 जागांची घोषणा केली असली तरीही शिर्डीसह अद्याप अनेक जागांवर तिढा कायम आहे. शिर्डीत ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असल्याने आता महायुतीकडून कोण याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. विद्यमान खासदारांचा नकारात्मक अहवाल आणि ‘मनसे’ची महायुतीत ‘एन्ट्री’ हा योगायोग जुळवून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्या कधीकाळचा विश्वासू सहकारी असलेल्या बाळा नांदगावकर यांच्यासाठी आग्रही असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राज्यात दोन्ही बाजूने जागांचा तिढा कायम असतांनाही ‘शिर्डी’च्या चर्चेने राज्यात पुन्हा मुसंडी मारली आहे.

विविध राजकीय नाट्य आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही वेळातच देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. मात्र देशातील बहुतेक राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी सुरु असलेल्या जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरुच आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या चिन्हावर लढविल्या जाणार्या राज्यातील 20 जागांसह देशातील 267 जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर करुन आघाडी घेतली असली तरीही, महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सोबतच्या वाटाघाटी अजूनही संपलेल्या नाहीत. जागा वाटपाचा समाधानकारक फार्म्युलाच तयार होत नसल्याने वारंवार बैठका होवूनही महायुती आणि महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांची ‘गुपितं’ उघडी करण्यासाठी राज ठाकरेंची बुलंद तोफ वापरण्यासाठी भाजपने त्यांना महायुतीत घेण्याचा घाट घातल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

साहजिकच राज ठाकरे यांच्या समावेशासाठी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही जागा द्याव्याच लागतील. भाजपला मुंबईवर वर्चस्व निर्माण करायचे असल्याने मुंबई व उपनगरातील बहुतेक जागा ‘कमळ’ चिन्हावर लढविण्याची योजना आखली गेली आहे. त्यामुळे मनसेला महायुतीत घेवून मुंबईतील मराठी मतं पदरात पाडून घ्यायची आणि त्या बदल्यात शिर्डी लोकसभेची जागा त्यांना द्यायची अशी सध्या चर्चा सुरु आहे. शिर्डी लोकसभा अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव मतदार संघ असल्याने या जागेवर राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह त्यांच्या समर्थकांकडून सुरु असल्याचीही चर्चा आहे. सध्याच्या चर्चेनुसार शिंदेंच्या शिवसेनेला 11 जागा देण्यास भाजप तयार आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत 13 खासदार असल्याने किमान तितक्या जागांच्या मागणीवर ठाम आहेत. भाजप नाकारत असलेल्या ‘त्या’ दोन जागा कोणत्या असाही प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. त्यात शिर्डी मतदार संघाचा समावेश असल्याचेही बोलले जात आहे.

दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मश्री) शिवसेनेत असताना बाळा नांदगावकर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा विखे परिवाराशी खूप जवळचा संबंध आलेला आहे. आजही नांदगांवकर आणि विखे यांच्यातील स्नेह कायम असल्याचे सांगितले जाते. 2029 साली शिर्डी लोकसभा मतदार संघ खुला होणार आहे. त्यामुळे डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासाठी पुढील पंचवार्षिक सोपी व्हावी असाही त्यामागील प्रयत्न असण्याची शक्यता आहे. बाळा नांदगावकर यांनीही त्यांच्या कार्यकाळात आपला स्वतःचा संपर्क वर्ग निर्माण केला होता. त्यातील अनेकजण आजही त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच शिर्डी लोकसभेची निवडणूक रंगतदार आणि तूल्यबळ होईल. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यासाठी आग्रही असल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे.

राज्यातील ठराविक लोकसभा मतदार संघात शिर्डी लोकसभेची मोठी चर्चा आहे. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या दाव्यासह माजीमंत्री बबनराव घोलप आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी दावा ठाकलेल्या या मतदार संघात आता मनसेच्या बाळा नांदगावकर यांचाही प्रवेश झाला आहे. नांदगावकर यांनी कधीकाळी शिवसेनेच्या संपर्क प्रमुखपदी काम करताना आपल्या कार्यकर्त्यांचा संचही बांधला होता. त्यातच विखे पाटलांचा उमेदवार म्हटल्यावर ‘यंत्रणा’ही चोखपणे काम करणार. दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरेंसारखा स्थानिक आणि जमिनीवरचा उमेदवार कडवी झूंज देण्यास सज्ज आहे. ‘आपला माणूस – आपल्यासाठी..’ हे त्यांचे वाक्य खरोखरी वास्तव आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटला तरीही शिर्डीची लढत शेवटपर्यंत लक्ष वेधणारीच ठरणार हे निश्चित.

