संगमनेरात पुन्हा ‘एटीएम’ फोडीचे सत्र सुरु! समनापूरातील एटीएम डिटोनेटरचा वापर करुन फोडले; तीन लाखांची रक्कम लंपास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही वर्षांपूर्वी संगमनेरातील एकामागून एक एटीएम फोडून त्यातील लाखों रुपयांची रोकड लंपास होण्याचे तपास अजूनही अंधारात असतांना आता पुन्हा एकदा तेच सत्र सुरु झाले आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएम लुटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली असून चक्क एटीएम फोडण्यासाठी डिटोनेटरचा वापर करण्यात आला आहे. सदरची घटना शहरानजीकच्या समनापूर गावात घडली असून रस्त्यालगतच असलेले ‘इंडिया वन’ कंपनीचे एटीएम फोडून त्यातील सुमारे तीन लाखांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. चोरट्यांना वापरलेल्या डिटोनेटरमुळे येथील एटीएम मशिनच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या आहेत. या घटनेने संगमनेरातील रक्षकाविना असलेल्या एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून वाढत्या थंडीसह पोलिसांची हुडहुडीही वाढली आहे.


गेल्या चार वर्षांपूर्वी संगमनेरात एटीएम फोडीचे लोण पोहोचले होते. त्यावेळी नाशिक रस्त्यावरील एटीएमसह मालदाड रोड व अकोले बायपास रस्त्यावरील बी.एड्.कॉलेज समोरील एटीएम फोडून या सर्वांमधून लाखों रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने घडलेल्या या घटनांमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅसकटरचा वापर केल्याचे त्यावेळी समोर आले होते. विशेष म्हणजे यातील बहुतेक घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही कैद झाले, मात्र त्यातून पोलिसांना चोरट्यांचा माग काढण्यात आजवर यश मिळालेले नाही. यासर्व घटना काही वर्षांपूर्वी घडलेल्या असल्याने त्याच्या चर्चा थांबल्या असतांना आता समनापूरातील एटीएम फोडीने त्यांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.


आज (ता.6) संगमनेर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या समनापूर शिवारात सदरची घटना घडली आहे. येथील कोल्हार-घोटी मार्गाच्या कडेलाच असलेले ‘इंडिया वन’ कंपनीचे एटीएम फोडल्याचे आज सकाळी समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी केलेल्या पाहणीत सदरचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क डिटोनेटरचा वापर केल्याचे समोर आले आहे. एटीएमला डिटोनेटर बांधून त्याचा स्फोट करण्यात आला व त्यानंतर फुटलेल्या एटीएममधून सुमारे तीन लाख रुपयांची रक्कम काढून चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.


जीलेटीन व डिटोनेटरचा वापर विहिरी खणण्यासह दगडांच्या खाणीत केला जातो. चोरी करण्यासाठी अशा प्रकारच्या स्फोटकांचा वापर करण्याची संगमनेर तालुक्याच्या इतिहासातील बहुधा ही पहिलीच वेळ असावी. विशेष म्हणजे डिटोनेटरद्वारा केल्या जाणार्‍या स्फोटाचा मोठा आवाजही होतो. सदरचे एटीएम उडवतांनाही मोठा आवाज झाला असेल, मात्र तो आसपास राहणार्‍यांच्या कानापर्यंत कसा पोहोचला नाही याचे आश्‍चर्यही व्यक्त होत आहे. या स्फोटात एटीएम मशिनच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या आहेत.

Visits: 170 Today: 1 Total: 1867503

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *