‘राहीबाई’ म्हणजे आधुनिक युगातील ‘सीतामाता’ ः राज्यपाल कोश्यारी वंदे भारत विकास फाउंडेशन व अॅडराईज इंडियाच्या अॅपचे लोकार्पण
नायक वृत्तसेवा, अकोले
राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभे केलेले काम हे देशातील शेतकर्यांसाठी उपयुक्त आहे. या कामासाठी त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे याचा आम्हांला अभिमान आहे. आधुनिक युगात जगताना सकस आणि शुद्ध अन्न प्रत्येकाच्या ताटात जाण्यासाठी राहीबाईचे विचार स्वीकारावेच लागतील. यामुळेच ‘राहीबाई’ या आधुनिक युगातील ‘सीतामाता’ असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढले.
राजभवन मुंबई येथे वंदे भारत विकास फाउंडेशन व अॅडराईज इंडिया यांनी शेतकर्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य वर्धनासाठी विकसित केलेल्या ‘वंदे किसान अॅप’चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री, आमदार अॅड. आशिष शेलार, अॅडराईज इंडिया व वंदे भारत विकास फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, व्यवस्थापकीय भागीदार अनिरुद्ध हजारे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहून शेतकर्यांनी पुनश्च सेंद्रीय शेतीची कास धरावी असे आवाहन केले. सेंद्रीय शेती करताना देशी बियांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. त्यावेळेस राहीबाई यांच्या विचारानेच पुढे जावे लागेल. देश अन्नधान्याच्या बाबतीत आयातदार असल्याचे आपण पहिले आहे. त्याकाळात देशात अमेरिकेकडून निकृष्ट गहू येत होता. भारताने गेल्या 40-50 वर्षांत कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली नसती तर कोरोना काळात अर्थव्यवस्था ठप्प असताना हजारो लोक उपासमारीचे बळी झाले असते, असे राज्यपालांनी यावेळी सांगत गावागावातील शेतकर्यांना नवीनतम ज्ञान हवे आहे. मोबाईल अॅप व डिजिटल माध्यमातून ते शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोबाईल कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. याचबरोबर कृषी विद्यापीठांनी शेतीचे आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी आपण सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना करू, असे सांगितले.
याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री राहीबाई पोपेरे, विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी धीरज जुनघरे, सर्पदंश तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, शेती हवामान तज्ज्ञ डॉ. उदय देवळाणकर, प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके, शेती दुरस्थ शिक्षणाचे प्रणेते डॉ. सूर्यकांत गुंजाळ, कृषी पर्यटन तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे, कुलगुरू डॉ. संजय सावंत, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नारायणगाव ग्रामोन्नती कृषी मंडळ संस्थेचे अनिल मेहर यांना वंदे किसान कृषी सन्मान देऊन गौरविण्यात आले. अनिरुद्ध हजारे यांनी स्वागतपर भाषणात अॅडराइज इंडियाच्या कार्याबद्दल आणि पुढील प्रकल्पांबद्दल माहिती दिली. रमेश मढव यांनी आभार प्रदर्शन केले.