स्व.इंदिरा गांधींचा धाडसी पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा ः थोरात

स्व.इंदिरा गांधींचा धाडसी पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा ः थोरात
यशोधन संपर्क कार्यालयात जयंतीनिमित्त अमृत उद्योग समूहाच्यावतीने अभिवादन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाच्या एकात्मतेसाठी व अखंडतेसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले आहे. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या विकासात मोठे योगदान देताना त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रियीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद यांसह बांगलादेशाची निर्मिती त्यांनी केली. एक धाडसी पंतप्रधान म्हणून त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा निर्माण झाला असल्याचे गौरवोद्गार संगमनेरातील थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी काढले.

भारताच्या माजी पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मानाचे स्थान मिळवून देणारे कणखर नेतृत्व स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरातील यशोधन संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपसभापती नवनाथ अरगडे, आदिवासी सेवक बाबा खरात, शिवाजी जगताप, पुंजाहरी दिघे, विजय हिंगे आदिंसह यशोधन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना संचालक थोरात म्हणाले, बालपणापासूनच स्वातंत्र्यलढ्यात झोकून देणार्‍या इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देश उभारणीत मोठे योगदान दिले. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथीनिमित्त अमृत उद्योग समूहाच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात येत असते. या कणखर नेतृत्वाच्या विचारांची देशाला कायम गरज असून त्यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तीदायी ठरणारे असल्याचे ते म्हणाले.

तर बाबा ओहोळ म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याने कायम पुरोगामी विचार व काँग्रेसची विचारधारा जपली आहे. इंदिरा गांधींचे देशाच्या अखंडतेसाठी मोठे योगदान असून त्यांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. त्यांचे विचार जोपासत प्रत्येकाने भारत मातेच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध रहावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक बाबा खरात यांनी करुन शेवटी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *