… अखेर हिवरगाव पठार येथील वाड्या-वस्त्यांवर मिळाले पाणी! दैनिक नायकच्या वृत्ताची दखल घेत बंद असलेले रोहित्र बसविले
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार येथील वीज रोहित्र गेल्या चार दिवसांपासून जळाल्याने आदिवासी वाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शेजारीच असणार्या डोंगदर्यांतील कपारीतून झिरपणार्या झर्यातून आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी वाहून आणावे लागत असल्याची दुर्दैवी वेळ आली होती. याबाबत रविवारच्या (ता.4) अंकात दैनिक नायकने ‘हिवरगाव पठार येथील वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई’ मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची महावितरण विभागाने तत्काळ दखल घेत रोहित्र बसविले आहे. यामुळे आदिवासी बांधवांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी परवड थांबणार आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. हिवरगाव पठार गावांतर्गत असलेल्या गिर्हेवाडी, पायरवाडी, सुतारवाडी, कोळेवाडी, दगडसोंडवाडी आदी आदिवासी वाड्यांना गावातील सार्वजनिक विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी येथील वीज रोहित्र जळाले. यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला होता. परिणामी येथील आदिवासी बांधवांना डोंगरदरीत असलेल्या झर्याचा आधार घ्यावा लागला. त्यासाठी पहाटपासूनच तेथे जावून तांब्याच्या सहाय्याने झर्यातून पाणी काढून हंडा भरुन घ्यावा लागायचा. त्यानंतर भरलेला हंडा डोक्यावर घेवून महिलांसह पुरुषांना डोंगर उतरुन घरी यावे लागायचे. एवढे भीषण वास्तव असतानाही सरकारच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले.
पिण्याच्या पाण्यासाठी असे हाल सुरू झाल्याने रोजगाराकडे लक्ष द्यावे की पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्यावे या विवंचनेत आदिवासी बांधव सापडले होते. याबाबतच्या वृत्ताची महावितरण कंपनीने तत्काळ दखल घेत बंद पडलेल्या रोहित्राच्या ठिकाणी महावितरणचे सहाय्यक अभियंता एस.एस.घुगे, कर्मचारी विशाल जाधव, अक्षय घोडेकर यांनी नवे रोहित्र बसवून यक्षप्रश्न सोडविला आहे. याबद्दल ग्रामस्थांनी आणि आदिवासी बांधवांनी आभार मानले आहे.