संगमनेरकर अनुभवताय महाबळेश्वरचे वातावरण! पारा 17 अंशावर; चार दिवसांनंतर आज झाले सूर्यदर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारी दिवसभर झालेल्या पावसाने भुरभुरीने संगमनेर तालुक्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून दिवसाचे तापमान 17 अंषावर आले आहे. गुरुवारी सायंकाळी शहरासह पुणे-नाशिक महामार्गावर दाट धुक्याची चादर पसरल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. आज सकाळीही शहरात दाट धुक्याचा अनुभव संगमनेरकरांनी घेतला, मात्र गुरुवारी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने वातावरणातील गारवा कमी झाला असून दुपारी बाराच्या सुमारास पाराही 23 अंशावर गेला होता. आज दुपारच्यावेळी सूर्यनारायणानेही दर्शन दिल्याने वातावरणातील ऊब वाढली आहे.

गेल्या बुधवारी (ता.1) संगमनेर तालुक्यात बहुतेक सर्व ठिकाणी दुपारी सुरु झालेला पाऊस गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होता. सध्या थंडीचे दिवस आणि त्यातच ढगाळ वातावरणात पाऊसही झाल्याने तालुक्यातील वातावरणात मोठे बदल झाल्याचे दिसले. अनेक वर्षांनंतर भरदुपारी तालुक्यातील वातावरणात गारवा निर्माण होवून पारा अगदी 16 ते 17 अंशापर्यंत खाली होता. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना भर दुपारी स्वेटर व कानटोप्या घालण्याची तसेच शेकोट्या पेटवून ऊब घ्यायची स्थिती निर्माण झाली होती.

आज शुक्रवारी सकाळपासून मात्र वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. गुरुवारी दिवसभर अपवाद वगळता पाऊस थांबल्याने व त्याची जागा धुक्याने घेततल्याने वातावरणातील गारवा कमी झाला झाला आहे. सकाळी शहरातील वातावरण 18 अंश थंड होते. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होवून दुपारी बारापर्यंत पारा 23 अंशावर गेला. आज सायंकाळपर्यंत वातावरणातील गारवा 25 अंशावर राहण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तविली गेली. त्यासोबतच चार दिवसांनंतर आज माध्यान्नाला सूर्यनारायणाचेही दर्शन घडले. मात्र अद्यापही तालुक्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळी वातावरण असून ते पुढील चार दिवस म्हणजे सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
