पठारभागातील शेतकर्यांवर अवकाळीचे अस्मानी संकट एकीकडे मानवनिर्मित तर दुसरीकडे निसर्गनिर्मित संकटाने शेतकरी हतबल
नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने पिकांवर मव्याचा व करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यातच बुधवारी (ता.1) दिवसभर पावसाची संततधार व सर्वत्र धुके असल्याने शेतकर्यांनी अक्षरशः डोक्यालाच हात लावला आहे. सतत दुष्काळाशी दोन हात करणार्या आणि बाजारभावाशी झगडणार्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेतकर्यांवर आता अवकाळीचे अस्मानी संकट आल्याने ते पुरते हतबल झाले आहेत.
संगमनेर तालुक्याचा पठारभाग म्हटला, की नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तरीही शेतकरी दुष्काळाशी तोंड देत विविध पिके घेतात. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकामागून एक आलेल्या सुलतानी संकटांनी शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. इकडून-तिकडून बी आणि कर्ज घेऊन शेतकर्यांनी गावठी कांद्याच्या लागवडी केल्या आहेत. सध्या काही शेतकर्यांची लाल कांदे काढण्याची मोहिमही सुरू आहे. मात्र बाजारभाव नसल्याने शेतकर्यांचा पाय खोलातच जात आहे.
एकीकडे मानवनिर्मित तर दुसरीकडे निसर्गनिर्मित संकट येत असल्याने शेतकरी वैतागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पठारभागात गारवा आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय दोन दिवसांपासून नागरिकांना सूर्यदर्शन सुद्धा झाले नाही. या वातावरणामुळे परिसर झाकाळून गेला असून, पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यातच बुधवारी दिवसभर सुरू असलेला रिमझिम पाऊस व सर्वत्र धुके असल्याने शेतकर्यांना पिके वाचविण्यासाठी काय करावे हेच सूचेनासे झाले आहे. काढणीसाठी आलेल्या लाल कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांनी नवीन गावठी कांद्याच्या लागवडी केल्या आहेत; मात्र त्यावरही मव्याचा व करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. हे कमी म्हणून काय शेतीपंपाची वीज जोडणी देखील महावितरण कंपनीने तोडली आहे. अशा परिस्थितीत रब्बी पिके व फळबागा वाचविण्यासाठी शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
सध्या ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतकर्यांनी रब्बी पिकांची काळजी घ्यावी. कांदा उत्पादकांनी करपा व मर रोगावर बुरशीनाशकाची फवारणी करावी.
– प्रवीण गोसावी (तालुका कृषी अधिकारी, संगमनेर)