मनापासून काम केल्यास यश हमखास मिळते ः हट्टंगडी कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचा रोहिणी हट्टंगडी यांच्या व्याख्यानाने समारोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणतेही काम हे अत्यंत मनापासून करावे. एखादी भूमिका नाटक किंवा चित्रपटातील नायिकेची असो की गृहिणीची असो त्या भूमिकेशी समरस झाला तर तुम्हाला नक्कीच यश मिळते, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथे सात दिवस चाललेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचा समारोप ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची मुलाखत कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बियाणी यांनी घेत केला. या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा दुर्गा तांबे या होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष तथा प्रकल्पप्रमुख अरुण ताजणे, सचिव जसपाल डंग, डॉ. अनिल राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलाखतीमध्ये बोलताना अभिनेत्री हट्टंगडी म्हणाल्या, मला अभिनयाचा वारसा माझ्या आईवडिलांपासून होता. मी लहानपणापासून नाटक करण्यास सुरुवात केली. अभिनय क्षेत्रात करियर करण्याची सुरुवात महात्मा गांधींजीच्या चित्रपटामध्ये कस्तुरबा गांधी यांची भूमिका करून केली. यावेळी सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ आणि शहनशाह या दोन चित्रपटातील आलेले अनुभव कथन केले. ‘आई तुला कुठे ठेवू’ या नाटकावर झालेली टीका आणि ते नाटक फसले असल्याचे सांगितले. कन्नडी, मल्याळम भाषांमध्ये काम करताना आलेले अनुभव सुद्धा सांगितले. मात्र, इतर भाषांपेक्षा संस्कृत भाषा ही सर्वात चांगली भाषा आहे. यशस्वी कलाकार होण्यासाठी आणि इतर राज्यातील भाषा येण्यासाठी संस्कृत भाषा येणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

याचबरोबर यशस्वी गृहिणी भूमिकेवर बोलताना म्हणाल्या, आईवडिलांनी मला जशी साथ दिली तसीच साथ सासू व सासरे आणि पतींनी सुद्धा दिली. सासू मला जबदारीची जाणीव करुन देत असते. अनेक गायिका लग्नानंतर बदलेल्या आहेत, मात्र लग्नानंतर त्या मुलीच्या आवडीनुसार त्यांना वागवा, सासू सासर्यांनी सूनेला तिच्या मनासारखे काम करू द्या असा सल्ला दिला. समारोप करताना नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, संगमनेर शहर सांस्कृतिकदृष्ट्या महत्वपूर्ण शहर आहे म्हणून अनंत फंदी हे महान कलाकार या शहरात होऊन गेले. त्यांच्या नावाने नगरपालिकेने खुले नाट्यगृह सुरू केले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन पापय्या सिरसुल्ला यांनी केले तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार बिहाणी व प्रकल्पप्रमुख अरुण ताजणे यांनी आभार मानले.

