पठारभागातील घारगाव भूगर्भीय ‘गुढ’ धक्क्यांनी हादरले! यापूर्वीपासून वारंवार जाणवणार्या भूकंपसदृश्य धक्क्यांचे केंद्रही बदलले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या मध्यवर्ती पठार क्षेत्रात मोडणार्या संगमनेर तालुक्याचा पठारभाग आज पुन्हा एकदा गुढ धक्क्याने हादरला. मागील काही वर्षांपासून सातत्याने अशा प्रकारचे धक्के सहन करणार्या पठारवासीयांच्या मनात आजच्या भूगर्भीय हालचालींनी भितीसह शंकाही निर्माण केल्या. यापूर्वी बसलेल्या अशा प्रकारच्या सर्व धक्क्यांचे केंद्र बोट्यानजीक असताना आजचा धक्का मात्र घारगावसह केवळ आसपासच्या गावांनाच जाणवला, बोट्यापर्यंत त्याचा कंप पोहोचलाच नाही. त्यामुळे पठारभागात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. हा धक्का सौम्य स्वरुपाचा होता, तरीही त्यातून पठार भागातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. नाशिकच्या मेरी संस्थेतील भूकंप मापकावर मात्र अशा कोणत्याही धक्क्याची नोंद झालेली नाही. भूगर्भात होणार्या हालचालींमुळे अशा गोष्टी घडतात, मात्र त्याचे स्वरुप सौम्य असल्याने त्यातून नुकसान होण्याची शक्यता कमी असते. नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
जिल्ह्यातील डोंगराळ तालुक्यांच्या श्रेणीत मोडणार्या संगमनेर तालुक्याचा पठारावरील भाग मात्र मध्यवर्ती पठार क्षेत्रात मोडतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील समांतर खडकावर पसरलेल्या 46 गावांच्या पसार्यात विस्तारलेल्या या भागात साकूर, घारगाव आणि बोटा ही उलाढालीची केंद्र समजली जातात. बोट्याची हद्द थेट पुणे जिल्ह्याला लागत असल्याने व्यापारी दृष्ट्याही या गावाला अगदी इतिहासापासून महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवासी अगदी वर्षोनुवर्ष अगदी समाधानाने नांदत आहेत. या क्षेत्रात फुललेल्या बाजारपेठांनी पठारभागाच्या समृद्धीत मोठी भर घातली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बोटा-माळवाडीचा परिसरात गुढ भूगर्भीय हालचालींच्या सावटात सापडला आहे. कधी अचानक धरणीला कंप सुटतो, तर कधी ढगातला गडगडाट जमिनीतून कानी पडतो. या प्रकारांनीं पठारभागातील बोटा, माळवाडी, कुकुटवाडी व आंबी दुमाला गावचा परिसर कायमच हादरलेला. 2018 साली जुलै-ऑगस्ट दरम्यान अशाच भूगर्भीय हालचालींनी या भागात दहशत निर्माण केली होती. अचानक जाणवणारा धरणीकंप, जमिनीतून होणारा गडगडाट यामुळे या भागातील नागरिकांनी घरे सोडून शेतात पालं ठोकली होती. 21 ऑगस्ट आणि त्यानंतर लगेच 24 ऑगस्ट अशा दोनदा हा भाग असा काही हादरला की त्याची नोंद थेट 2.5 रिश्टर स्केल इतकी झाली.
पठारावर काहीतरी वेगळंच होतयं अशा चर्चा रंगल्याने नागरिकांच्या मनात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची दखल घेत जिल्ह्याधिकार्यांसह भूगर्भ तज्ज्ञांनाही पठारभागात येवून नागरिकांशी संवाद साधावा लागला होता. अशा घटना का व कशा स्वरुपाच्या घडतात याविषयी लोकांना माहितीही देण्यात आली. जनजागृती पथकांनी गावोगावी कार्यक्रम करुन लोकांच्या मनातील भिती दूर करण्यासह अशा स्थितीत कसे वावरावे याबाबत प्रबोधनाचे कार्यक्रमही पार पडले. त्यातून पठारभागात भूकंपमापक यंत्र बसविण्याची जोरदार मागणीही झाली. मात्र आजवर आश्वासने मिळूनही ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे पठारावरील या भागातील नागरिक आजही भयाच्या सावटातच वावरत आहेत.
गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत जगभरासह पठारालाही कोविडचे भय होते. त्यामुळे या कालावधीत बोटा व त्यालगतच्या परिसरात सतत होणार्या भूगर्भीय हालचालीही थंडावल्या होत्या. मात्र कोविडच्या तिसर्या लाटेतून सावरत असतांना आज सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी घारगाव परिसर अशाच गुढ भूगर्भीय धक्क्यांनी हादरला. विशेष म्हणजे यापूर्वी अशा धक्क्यांचे केंद्र माळवाडी व बोटा परिसरात असत व त्याचा हादरा कुरकुटवाडी, आंबी दुमालापर्यंत जाणवत. यावेळी बसलेला धक्का मात्र केवळ घारगाव परिसरालाच जाणवला आहे. त्यामुळे भूगर्भातील हालचालींचे केंद्र बदलले की काय अशा प्रकारच्या चर्चा पठारभागात सुरु आहेत. आज सकाळी घारगावला बसलेला धक्का सौम्य स्वरुपाचा होता, त्याची कोणतीही नोंद नाशिकमधील मेरी संस्थेच्या भूकंप मापकावर झालेली नाही. अशाच प्रकारची नोंद पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणाच्या भूकंप मापकावरही घेतली जाते, मात्र तेथेही अशी नोंद झालेली नाही. अहमदनर जिल्ह्याचे भौगोलिक रचनेनुसार चार भाग आहेत. त्यात पश्चिती डोंगराळ भागात संगमनेर व अकोले तालुक्याचा समावेश होतो. मात्र तालुक्यातील पठारभाग मात्र जिल्ह्याच्या मध्यवर्ती पठारश्रेणीत मोडतो यात पारनेर तालुक्याचाही समावेश आहे. मागील दशकभरापासून या भागातील काही गावांना अशा प्रकारच्या गुढ हालचालींनी भयभीत केले आहे. प्रशासनाकडून प्रसंगानुरुप नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले जात असले तरीही त्यांच्या शंकांचे मात्र समाधान होत नसल्याने धक्क्यांनी निर्माण केलेली भीती कायम आहे.
भूगर्भात होणार्या हालचालींमुळे अशा गोष्टी घडतात, मात्र त्याचे स्वरुप सौम्य असल्याने त्यातून नुकसान होण्याची शक्यता कमी असते. तालुक्याच्या पठारभागातील काही गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या भूगर्भीय हालचाली होत असतात. त्यातून आवाज येणे, हादरे जाणवणे अशा घटना घडतात. पूर्वी तज्ज्ञांनी प्रत्यक्ष येथे येवून या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन निष्कर्ष काढलेले आहेत. अशा हालचालींमध्ये सातत्य असले तरीही त्याचे स्वरुप सौम्य असेल. नागरिकांनी घाबरुन जावू नये व कोणीही अफवा पसरवू नये.
– अमोल निकम
तहसीलदार – संगमनेर