बहुजन समाजातील मुलांना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले : वडितके

नायक वृत्तसेवा, आश्वी
कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांच्या विचारांचे खरे वारस होते. त्यांनी शिक्षणाला फक्त नोकरीचे साधन मानले नाही, तर सामाजिक परिवर्तनाची किल्ली मानली. गरीब, मागास व बहुजन समाजातील मुलांना ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वज्ञानाद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. आज अनेक शेतकऱ्यांची लेकरं डॉक्टर, अभियंते, अधिकारी झाली, हे कर्मवीरांच्या दूरदृष्टीचे फलित असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल व महाविद्यालयाचे प्राचार्य देवराम वडितके यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील इंग्लिश स्कूल व महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची शालेय दिंडी काढून शालेय जीवनातूनच सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला गेला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य देवराम वडितके बोलत होते.

पर्यवेक्षक दिपक चव्हाण म्हणाले, भाऊराव पाटील यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्यभर समर्पण केले. त्यांच्या विचारसरणीमुळे अनेक युवक-युवती प्रेरित झाले आहेत. त्यांच्या आदर्शातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, मेहनत करण्याची प्रेरणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची शिकवण मिळते.यावेळी सुभाष म्हसे,माजी सरपंच बाळकृष्ण होडगर, सुमतीलाल गांधी, वैभव ताजणे, अनिल मुंत्तोडे, अनिता गाडे, सुवर्णा वाकचौरे, रमेश थेटे, मोहन घिगे, राजेंद्र बर्डे, वैशाली सोसे, हरिभाऊ कोकाटे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 75 Today: 2 Total: 1102633
