सनदी लेखापालचे बनावट शिक्के व खोट्या सह्या; दोघांविरोधात गुन्हा
सनदी लेखापालचे बनावट शिक्के व खोट्या सह्या; दोघांविरोधात गुन्हा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील जुनी भारतीय स्टेट बँक परिसरातील जीएसटी सुविधा सेंटर चालकाने चक्क सनदी लेखापालचे बनावट शिक्के बनवून खोट्या सह्या केल्याची धक्कादायक बाब मंगळवारी (ता.15) उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सनदी लेखापाल विकास सुधाकर वैद्य यांचे शहरातील सावता माळी नगरमध्ये विकास वैद्य अॅण्ड असोसिएट नावाचे कार्यालय आहे. या कार्यालयात मंगळवारी साडेबारा वाजेच्या सुमारास अकोलेतील रोहिदास विठ्ठल धुमाळ हे कर्ज प्रकरणाकरिता प्रस्ताव तयार करण्यासाठी चौकशीकामी आले होते. त्यावेळी त्यांच्या प्रस्तातावर सनदी लेखापाल यांचे बनावट शिक्के व खोट्या सह्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची अधिक विचारपूस केली असता त्यांनी शहरातील जुनी भारतीय स्टेट बँकेजवळ जीएसटी सुविधा सेंटर नावाचे कार्यालय असल्याचे सांगून तेथेच प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले. त्यानंतर स्वतः सनदी लेखापाल वैद्य हे बनावट ग्राहक बनून सेंटरला गेले असता त्यांनी सेंटरचालक गणेश भोसले व सुवर्णा वर्पे यांच्याकडे कर्जाकरिता प्रस्ताव तयार करण्याबाबतची माहिती घेतली. त्यावेळी सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला. तसेच चिकणी ग्रामपंचायतसह सचिन एन.काते अॅण्ड कंपनीचे देखील शिक्के दिसून आले असल्याचे सनदी लेखापाल यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबत शहर पोलिसांनी जीएसटी सुविधा सेंटरचालक गणेश दयानंद भोसले (रा.पिंपरणे) आणि सुवर्णा अशोक वर्पे (रा.चिखली) या दोघांविरोधात गुरनं.1798/2020 नुसार भादंवि कलम 420, 465, 468, 471, 473, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे.