आता ‘अलिशान’ वाहनातून गोवंश मांसाची वाहतूक! कत्तलखाने बंद असूनही गोवंशाची कत्तल?; सहाशे किलोसह दोघांना अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दीड महिन्यापूर्वी संगमनेरच्या साखळी कत्तलखान्यांवरुन उठलेली राळ आता कुठेतरी खाली बसत असतानाच संगमनेरातून पुन्हा एकदा खळबळजनक वृत्त समोर आले आहे. यावेळी कसायांनी हमरस्त्यांचा वापर सोडून चक्क प्रवरा नदीच्या काठाने जाणार्‍या पंपींग स्टेशनच्या रस्त्याचा वापर करीत ‘अलिशान’ वाहनातून गोवंशाच्या मांसाची वाहतूक सुरु केल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांनी छापा घालीत असेच एक वाहन पकडले असून त्यातून तब्बल सहाशे किलो गोवंशाचे मांस हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतनगरमधील एकासह श्रीरामपूरच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेवरुन संगमनेरातील प्रमुख कत्तलखाने बंद असले तरीही चोरुन लपून गोवंशाच्या कत्तली सुरुच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता.12) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे गस्तीवाहन पंपींग स्टेशनपासून साईमंदिराच्या दिशेने येत असतांना समोर आलेल्या अलिशान वाहनावर पोलिसांची नजर खिळली. त्यातच सदरच्या अलिशान कारच्या मागील बाजूने एकसारखे पाणी पडत असल्याने पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी सदरचे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात गोवंशाचे मांस असल्याचे दिसून आले. याबाबत शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी वाहन जप्त करुन दोघांवरही कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार पोलीस हवालदार राजेश जगधने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी मोहम्मद साद खालील शेख (वय 20, रा.भारत नगर) व राशीद मुनीर सय्यद (वय 21, मूळ. रा.वाळीसगाव, हल्ली मुक्काम श्रीरामपूर) या दोघांनाही ताब्यात घेत वॉल्स वॅगन कंपनीची अलिशान कार (क्र.एम.एच.04/झेड.झेड.4560) व त्यात ठेवलेले सुमारे सहाशे किलो गोवंशाचे मांस असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेनंतर गेल्या दीड महिन्यांपासून संगमनेरातील गोवंशाची कत्तल पूर्णतः बंद असल्याची चर्चा फोल ठरली आहे.


सदर अलिशान वाहनावर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी सदरचे वाहन गोवंशाच्या मांसासह शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केले आहे. या घटनेला चोवीस तासांहून अधिक काळ लोटूनही ते वाहन तेथेच उभे असल्याने वाहनातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून परिसरात त्याचे थळगे साचले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या असतानाही पोलीस आणि तहसील कार्यालयाच्या अगदी दर्शनीभागातच पसरलेले हे ‘रक्तरंजित’ चित्र अव्यवस्थेचे प्रदर्शन घडवणारे ठरत आहे.

Visits: 202 Today: 1 Total: 1413633

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *