अखेर डॉ.योगेश निघुते याचा नियमीत जामीनअर्ज मंजूर! आठ दिवस कोठडीत काढल्यानंतर आज होणार कारागृहातून सुटका..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याचे वैद्यकीय क्षेत्र ढवळून काढणार्‍या डॉ.पूनम निघुते आत्महत्या प्रकरणातील संशयीत आरोपी डॉ.योगेश निघुते याचा नियमीत जामीनअर्ज संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज मंजूर केला आहे. त्याने गेल्या गुरुवारी (ता.21) संगमनेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याची रवानगी एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या दरम्यान त्याने विधिज्ञ अतुल आंधळे यांच्या मार्फत नियमीत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, मंगळवारी त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश एस.वाय.भोसले यांनी त्याचा अर्ज मंजूर करतांना त्याला 30 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यामुळे डॉ.निघुतेचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी ही घटना दोन महिन्यांपूर्वी 29 ऑगस्टरोजी घडली होती. संगमनेरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.योगेश निघुते याची पत्नी डॉ.पूनम यांनी आपल्या राहत्या घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती. जालना येथील माहेर असलेल्या डॉ.पूनम यांनी सुरुवातीपासून डॉ.पूनम यांच्या आत्महत्येबाबत साशंकता व्यक्त करीत त्यांचा पती डॉ.योगेश याच्या शारीरिक व मानसिक त्रासाला वैतागूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. मयत डॉ.पूनम यांचे शवविच्छेदनही औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले होते.


या प्रकरणी दाखल झालेली फिर्याद आणि त्यावरुन त्याच्यावर लावण्यात आलेली विविध कलमे लक्षात घेवून आपणास अटक होणार याची खात्री पटल्याने त्याने विधिज्ञ अतुल आंधळे यांच्या मार्फत संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणीच्यावेळी न्यायालयात नाट्यमय घडामोडी घडल्याने मृत डॉ.पूनमच्या भावाने सरकारी वकीलांवरच आक्षेप घेत त्यांना बदलण्याची मागणी केली. या सुनावणीत घाटी रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असल्याचे सांगत 18 सप्टेंबरपर्यंत आरोपीला अटक करणार नसल्याचे तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने डॉ.योगेशला 18 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने सबळ पुरावे सादर करीत त्याच्या अटकपूर्व जामीनाला विरोध केल्याने तो ग्राह्य धरुन न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. त्यामुळे त्या विरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.


गेल्या बुधवारी (ता.20) उच्च न्यायालयात त्याच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी झाली. त्यावेळी झालेला युक्तिवाद विचारात घेवून आपला जामीनअर्ज मंजूर होणार नसल्याची खात्री पटताच डॉ.निघुते याने त्याच दिवशी सायंकाळी आपला अटकपूर्व जामीनअर्ज मागे घेतला व दुसर्‍या दिवशी (ता.21) त्याने संगमनेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याच दिवशी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याची रवानगी एका दिवसासाठी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. 22 ऑक्टोबररोजी त्याची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालसामोर उभे केले असता त्याला सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. यादरम्यान त्याने विधिज्ञ अतुल आंधळे यांच्या मार्फत संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यालयात नियमीत जामीनासाठी अर्ज केला. त्यावर मंगळवारी (ता.26) सविस्तर सुनावणी घेण्यात आली. त्यावरील राखून ठेवलेला निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांनी आज जाहीर करतांना डॉ.पूनम निघुते आत्महत्या प्रकरणातील संशयीत आरोपी डॉ.योगेश निघुते याला 30 हजार हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कारागृहातून मुक्त करण्याचे आदेश बजावले आहेत. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील गवते यांनी बाजू मांडली, त्यांना विधीज्ञ राजू बबनराव खरे यांनी सहाय्य केले. तर बचाव पक्षाच्यावतीने विधीज्ञ अतुल आंधळे यांनी बाजू मांडली.

जिल्ह्याचे वैद्यकीय क्षेत्र ढवळून काढणार्‍या या आत्महत्या प्रकरणाची गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. गेल्या 21 ऑक्टोबररोजी या प्रकरणातील संशयीत आरोपी डॉ.योगेश निघुते याला अटक झाल्यानंतर त्याला दीर्घकाळ कारागृहात रहावे लागेल असा अंदाजही अनेकांनी वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात त्याच्या नियमीत जामीनअर्जावरील सुनावणीत तो या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा अथवा साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करु शकतो हे न्यायालयाला पटवून देण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याने अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांनी त्यांची जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

Visits: 42 Today: 1 Total: 410019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *