संगमनेरातील शाळांकडे विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी फिरविली पाठ! शिक्षकांची कोविड चाचणी अद्यापही अपूर्ण; तर पालकही संमत नसल्याचे चित्र
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासनाच्या आदेशाने सोमवारपासून (ता.23) टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना मिळाल्या असल्या तरी शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण न झाल्याने आणि पालकही संमत नसल्याने संगमनेर शहरासह तालुक्यातील बर्याच शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे वास्तव चित्र पहायला मिळाले.
कोरोना महामारीने अवघ्या जगात थैमान घातले आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असताना विविध आस्थापना आणि व्यवसाय अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. त्यातच सरकारने लॉकडाऊनमधून जनतेला दिलासा देण्यासाठी अनलॉकबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये दिवाळी पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आले आहे तर सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक पातळीवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार स्थानिक व्यवस्थापनाकडून नियोजन करण्यात आले काही शाळाही सुरू करण्यात आल्या, मात्र त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे. यामध्ये संगमनेर शहरातील दि. ग. सराफ विद्यालय, भाऊसाहेब गुंजाळ पा.कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानमाता विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय, ज्ञानमाता कॉन्व्हेंट स्कूल अशा सात शाळा सुरू होणार होत्या. परंतु, प्रत्यक्षात तीनच शाळा सुरू झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी दिली.
दरम्यान, प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी अद्यापही पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचेच यावरुन स्पष्ट होत आहे. तर अनेक शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांनीही शाळेकडे पाठ फिरविली आहे. त्यातच प्रशासनाने विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती घेण्यासाठी पत्र भरुन देण्याचा फतवा काढल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनीही शाळेत येण्याचे धाडस केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.