छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची संकल्पना काँग्रेसचीच! शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे; भूलथापा देवून संभ्रम निर्माण करण्याची भाजपाची खेळी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात व डॉ.सुधीर तांबे यांच्या माध्यमातून शहरात विकासाचे नवे पर्व सुरु झाले. गेल्या तीन दशकांत संगमनेरकरांना अभिमान वाटावा अशी कामे संगमनेरात झाली आहेत. मात्र विरोधकांकडून केवळ राजकारण सुरु असून निवडणूका जवळ आल्या की एखादा विषय घेवून कांगावा करण्याची भाजपाची सवयच यातून दिसून येते. संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक असावे ही कल्पना यापूर्वीच सभागृहात मांडली गेली असून त्यासाठी 50 लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यासह आवश्यक असलेली जागाही निश्चित करण्यात आली आहे. मात्र हाच मुद्दा घेवून शहर भाजपाध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले व जावेद जहागिरदार यांनी जनतेला भूलथापा मारुन त्यांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. ज्यांना नगरसेवक असतांना आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मुलभूत समस्याही सोडवता आल्या नाहीत, त्यांनी अशाप्रकारच्या राजकीय भूलथापा मारण्याच्या गोष्टी करु नयेत असा घणाघात काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला.
भाजपाचे संगमनेर शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले व सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी ‘मतदारांनी कौल दिल्यास भाजप संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून सुशासन देईल व शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेवून एक एकरच्या जागेत छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा बसवून आकर्षक स्मारकाची निर्मिती करेल’ अशी घोषणा मंगळवारी (ता.15) दैनिक नायकशी बोलतांना केली होती. त्यावरुन संगमनेरात निवडणूक पूर्व धुरळा उडालेला असतांना बुधवारी सायंकाळी काँग्रसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून भाजप पदाधिकार्यांच्या ‘त्या’ घोषणेचा खरपूस समाचार घेतला.
दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी विविध मुद्द्यांवर बोटं ठेवले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासातून वैभवशाली बनल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत दुर्गा तांबे यांनी संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासह भव्य-दिव्य स्मारकाची संकल्पना सभागृहात मांडली होती व त्यावर ठोस भूमिका घेतांना त्यासाठी 50 लाख रुपयांची भरीव आर्थिक तरतूदही केली आहे याकडे दिवटे यांनी लक्ष्य वेधले आहे. या संकल्पनेसाठी यापूर्वीच पालिकेने स्मारकासाठी आवश्यक असलेल्या जागेची सोय केली असून येणार्या कालावधीत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संगमनेरात छत्रपतींचे देखणे स्मारक उभे राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ज्या गोष्टीचा यापूर्वीच ठोस निर्णय झाला आहे आणि त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे असा विषय समोर करुन भाजप जनतेला भूलथापा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा घणाघातही त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले व सरचिटणीस जावेद जहागिरदार या दोघांनाही जनतेने सेवा करण्याची संधी दिली होती. विशेष म्हणजे गणपुले नगरसेवक म्हणून निवडून आले त्यावेळी राज्यात भाजपाचे सरकारही होते. मात्र असे असतांनाही ज्यांना साईनगर, पम्पींग स्टेशन यासारख्या दाट लोकवस्तीच्या आणि आपल्याच प्रभागातील नागरीकांच्या अडचणी सोडवता आल्या नाहीत ते आज खोटी आश्वासने देवून जनतेला भुलविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिवटे म्हणाले आहेत.
भाजपचे सरचिटणीस जावेद जहागिरदार यांना प्रत्येकवेळी आपला वॉर्ड बदलण्याची वेळ का आली? असा सवाल उपस्थित करतांना जर त्यांनी चांगले काम केले असते तर जनतेने त्यांना दोन-दोनवेळा पराभूत केले नसते अशी जोरदार टीकाही थेट जहागिरदार यांचे नाव घेत दिवटे यांनी केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी संगमनेरच्या नगराध्यक्षपदी असताना शहरात महात्मा जोतिराव फुले, लालबहाद्दूर शास्त्री व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकांची निर्मिती केली. त्याकाळी या स्मारकांबाबत जागेचे वादही निर्माण झाले होते. मात्र त्यांनी स्थानिकांच्या समन्वयातून त्यातून मार्ग काढून शहर सुशोभिकरणाच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्याचा त्यांनी कधीही प्रसिद्धीसाठी वापर केला नसल्याचेही दिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
निवडणुका जवळ आल्या की, कोणत्याही कारणाने भूलथापा मारुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याची भाजपची शैली आहे. मात्र संगमनेरकरांनी या दोघांनाही सेवेची संधी देवून त्यांच्यातील कर्तृत्त्व जोखून पाहिले आहे. त्यामुळे संगमनेरकर नागरिक अशा भूलथापांना कधीही बळी पडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करताना जावेद जहागिरदार यांना काँग्रेसनेच उपनगराध्यक्ष पदावर बसवून जनसेवेची संधी दिली होती, मात्र त्यांनी काँग्रेसशी गद्दारी करुन भाजपची घोंगडी अंगावर घेतली आहे. संगमनेरकर नागरिकांनी यापूर्वी कधीही गद्दारांना थारा दिलेला नाही हे जहागिरदार यांनी कदापी विसरु नये असा सल्ला देत दिवटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य-दिव्य स्मारकाची संकल्पना दुर्गा तांबे यांचीच असून आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखालीच त्याची निर्मिती होईल असा ठाम विश्वासही या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
येणार्या काही दिवसांतच राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर शहर भाजपाने दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा मुद्दा छेडून राजकीय धुरळा उठवला होता. आता त्यात काँग्रेसच्या शहराध्यक्षांनीही उडी घेतल्याने संगमनेरातील निवडणुकपूर्व वातावरण तापत असल्याचे चित्र निर्माण होवू लागले आहे. काँग्रेस शहराध्यक्षांच्या या सर्व आरोपांना भाजपा आता कसे उत्तर देणार याकडे संगमनेरकरांचे लक्ष्य लागले आहे.