अवैधरित्या बायोडिझेलची विक्री करणारी टोळी जेरबंद संगमनेर शहर पोलिसांची कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे इंधन दरवाढीचा दररोज नवा विक्रम प्रस्थापित होत असताना दुसरीकडे स्वस्त इंधनाच्या शोधात असणार्‍या नागरिकांना पर्यायी वापराचे बायोडिझेल मिळत आहे. परंतु, खरेदी-विक्रीचा शासनाचा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीररित्या बायोडिझेलची विक्री सुरू असलेल्या शहरातील मालदाड रस्ता परिसरातील एका ठिकाणावर शहर पोलिसांनी सोमवारी (ता.18) दुपारी बारा वाजेच्या सुमारास छापा टाकून बायोडिझेलसह विविध वाहने असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

संगमनेर शहरातील मालदाड रस्ता परिसरातील तिरंगा चौकालगत बेकायदेशीररित्या बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त खबर्‍यामार्फत समजली. त्यांनी ही माहिती हेडकॉन्स्टेबल अमित महाजन यांना कळवली. संबंधित खात्याचे कर्मचारी व पंच यांना घेऊन त्वरीत घटनास्थळी जाऊन छापा टाका अशा सूचना पोलीस निरीक्षकांनी दिल्याने पोलीस पथक व पुरवठा विभागाचे अधिकारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिरंगा चौकाजवळ पोहोचले. येथे असलेल्या दत्तनगर परिसरातील शंकर उपाध्याय यांच्या मोकळ्या प्लॉटमध्ये त्यांना वेगवेगळी वाहने संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळली. चौकशी केली असता बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली.
पोलिसांनी छापा टाकून झडती घेतली. त्यावेळी राहुल रमेश सस्कर (वय 27, रा.पावबाकी रस्ता) याला थांबवले असता आपण पिकअप चालक असल्याचे त्याने सांगितले. याठिकाणी आणखी पाचजण उभे होते. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. एका वाहनातून दुसर्‍या वाहनात बायोडिझेल बेकायदेशीररित्या भरले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी याठिकाणाहून तीन लाख दहा हजार रुपये किंमतीची पिकअप जीप (क्रमांक एमएच. 40, डीएस 7440), 1 लाख 72 हजार रुपये किंमतीच्या दोन टाक्या व फिल्टर मशीन, 6 लाख 25 हजार रुपये किंमतीचे आयशर वाहन (क्रमांक एमएच.17, बीवाय. 5245) असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला.

या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल अमित महाजन यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन राहुल रमेश रासकर, मोहम्मद यासीन वाहिद हुसेन (रा.उत्तराखंड), सुनील मारुती पावसे, संदीप मारुती पावसे, अण्णासाहेब जाधव (रा. हिवरगाव पावसा) व गणेश गणेश दादासाहेब सोनवणे (रा. वेल्हाळे), संजय पगडाल (रा.संगमनेर) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 285, 34, जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत. दरम्यान, या धडक कारवाईने अवैध इंधन विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Visits: 204 Today: 2 Total: 1115699

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *