खासगी चाचण्या थांबवताच तालुक्याचे संक्रमण आटोक्यात! गेल्या दोन दिवसांत निचांकी रुग्णसंख्या; सरासरीचा वेगही आता दररोज सत्तर रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या जुलैपासून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांतील कोविडच्या संक्रमणाला ब्रेक लागलेला असताना संगमनेर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या मात्र चिंताजनक ठरत होती. त्यातही दररोज समोर येणार्‍या अहवालांमध्ये खासगी प्रयोगशाळांच्या अहवालांची संख्या अधिक असल्याने संशयही निर्माण झाला होता. अखेर स्थानिक प्रशासनाने खासगी प्रयोगशाळांना संगमनेरातील स्त्राव चाचण्या करण्यास पुर्णतः मनाई केल्याने त्याचे परिणाम आता समोर येवू लागले असून मागील दोन दिवसांत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या कमालीची घसरली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तालुक्यातील कोविड बाधितांचे फुगलेले आकडे नेमके कोणाच्या फायद्याचे याची सखोल चौकशी करण्याची मागणीही आता समोर येवू लागली आहे.

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये जिल्ह्यासह तालुक्यात पाय रोवणार्‍या कोविडचे चालू वर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात सर्वात भयंकर रुप बघायला मिळाले. या दोन महिन्यात तालुक्यातील हजारों नागरिकांना कोविडचे संक्रमण झाले व शेकडो नागरिकांना आपले जीवही गमवावे लागले. त्यानंतर जूनपासून जिल्ह्यातील संक्रमणात मात्र हळूहळू घट होवू लागली. मात्र त्याचवेळी खासगी आरोग्य सेवांनी संपन्न असलेल्या संगमनेरसह काही तालुक्यांमधील संक्रमणाचा वेग मात्र टिकून होता. जिल्हा कोविडच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतांना संगमनेर व पारनेर तालुक्यासारख्या ठिकाणाहून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत गेल्याने जिल्ह्याच्या चिंता वाढून राज्यातील सर्वाधीक संक्रमित जिल्ह्यात अहमदनगरचा समावेश होवू लागला.

त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष जिल्ह्यावर खिळल्याने जिल्हा यंत्रणांनी यामागील कारणांची मिमांसा करण्यास सुरुवात केली. त्यातूनच सरकारी रुग्णालयात अथवा आरोग्य केंद्रांमध्ये होणार्‍या चाचण्यातून समोर येणार्‍या रुग्णांची संख्या खासगी प्रयोगशाळेच्या चाचण्यांपेक्षा खुप कमी असल्याचे निरीक्षण स्थानिक प्रशासनाने नोंदविले. त्यातूनच खासगी प्रयोगशाळांबाबत पुन्हा एकदा संशय निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनाने संगमनेरातील जवळपास 46 खासगी कोविड आरोग्य केंद्रांना संशयीत रुग्णांची स्राव चाचणी शासकीय यंत्रणेमार्फतच करण्याच्या सूचना दिल्या. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आणि टप्प्याटप्प्याने त्याचे परिणामही समोर येवू लागले आहेत.

गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यातून दररोज सरासरी दिडशेहून अधिक रुग्ण समोर येत होते. मात्र प्रशासनाने खासगी प्रयोगशाळांच्या चाचण्यांवर मर्यादा आणल्यानंतर चालू महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत संक्रमणाचा वेग निम्म्याने खाली आला, तर नंतरच्या आठच दिवसांत त्यात आणखी घट होवून मागील महिन्याच्या सरासरी दिडशे रुग्णांवरुन आजच्या स्थितीत 70 रुग्ण प्रति दिवसापर्यंत घसरला आहे. यावरुन ‘काही’ खासगी प्रयोगशाळांचा झोल पुन्हा एकदा उघड झाला आहे. यावरुन संक्रमण आटोक्यात येवूनही काही प्रयोगशाळा व काही रुग्णालयांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी सामान्य रुग्णांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरजही निर्माण झाली आहे.

मागील दोन दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्या आश्चर्यकारकरित्या घसरली असून दररोज शंभरावर रुग्ण समोर येणार्‍या संगमनेर तालुक्यातून दोन दिवसांत अवघे 25 रुग्ण आढळले आहेत. आजही तालुक्यातून केवळ 13 जण बाधित असल्याचे समोर आले असून त्यात शहरातील अलकानगर येथील 53 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. तर ग्रामीणभागातील कोकणगाव येथील 29 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 25 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय तरुण, जोर्वे येथील सातवर्षीय मुलगी, निमगाव टेंभी येथील 35 वर्षीय तरुण, वनकुटे येथील 41 वर्षीय महिला, सायखिंडीतील 51 वर्षीय इसम व आश्वी येथील 46 वर्षीय इसमाचा समावेश आहे. आजच्या अहवालात अहमदनगर (भिंगार) येथील 16 वर्षीय मुलाचाही संगमनेरच्या यादीत समावेश आहे.


जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घसरण..
संगमनेर तालुक्यासह गेल्या दोन दिवसांत संपूर्ण जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घट नोंदविली गेली आहे. आजच्या अहवालात जिल्ह्यात सर्वाधीक 21 रुग्ण राहुरी तालुक्यात आढळले आहेत. तर राहाता 19, नगर तालुका 17, कोपरगाव 14, अहमदनगर महापालिका व पारनेर प्रत्येकी 13, संगमनेर 12, इतर जिल्ह्यातील व पाथर्डी प्रत्येकी नऊ, श्रीगोंदा 08, नेवासा सात, शेवगाव सहा, अकोले पाच, जामखेड चार व कर्जत आणि श्रीरामपूर प्रत्येकी तीन अशा एकूण अवघ्या 163 रुग्णांचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे. ही रुग्णसंख्या मागील आठ महिन्यांतील सर्वात निचांकी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *