शेतकर्‍यांच्या समस्यांकडे महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष क्रांतीसेनेचे मुख्यमंत्र्यांसह, संबंधित मंत्र्यांसह सचिवांना निवेदन

नायक वृत्तसेवा, राहुरी
महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंद ठेवला. परंतु राज्यातील शेतकर्‍यांच्या समस्यांकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने अखिल भारतीय क्रांतीसेनेच्यावतीने शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे आदिंसह संबंधित विभागाच्या सचिवांना नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशमधील घटनेचा निषेध करत 11 ऑक्टोबर, 2021 रोजी महाराष्ट्र बंद केला. याबाबत सरकारचे शेतकरी या नात्याने आभार व्यक्त केले आहे. यातून आपले सरकार हे शेतकर्‍यांचे कैवारी आहे, हे सिद्ध झाले आहे. परंतु अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी शासकीय स्तरावर मोजणी करण्यासाठी, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला दूध दरवाढीसाठी, राज्यातील शेतकर्‍यांना मोफत वीज पुरवठा करण्याबाबत, राज्यातील शेतकर्‍यांना मोफत सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळण्याबाबत, राहुरी तालुक्यातील कोंढवड-तांदूळवाडी येथील मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी, राहुरी तालुक्यातील कांदा बियाणे फसवणूक प्रकरणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळून संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदनाद्वारे शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी मागण्या केल्या आहे.

मात्र, गेल्या दीड वर्षांपासून वेळोवेळी पाठपुरावा करूनही महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसून येत नाही. आपण पाठवलेल्या पत्र व्यवहारावरून संबंधित खात्यांकडून कुठलिही कार्यवाही आत्तापर्यंत झाली नाही. आपल्या सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंद ठेवला. परंतु राज्यातील शेतकरी कोरोना काळापासून शेतमालाला योग्य हमीभाव व शेतीपूरक व्यवसायाला मिळत असलेल्या दरांमुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व गोष्टींमुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. राज्यातील शेतकरी मरणयातना भोगत असताना आपल्या सरकारने पिकांना पाण्याची गरज असताना भर उन्हाळ्यात शेतीपंपाचे वीज रोहित्र बंद करुन वीज बिलाची पठाणी वसुली केली. दूध दराबाबतही आपल्या सरकारने योग्य निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांच्या या प्रश्नांकडे आपल्या सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

या प्रश्नांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देऊन शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष भागचंद औताडे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, संघटक जालिंदर शेडगे, जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे, सुभाष दरेकर, बाळासाहेब भोर, संदीप उंडे, भगवान पेरणे, शेखर पवार, सचिन गागरे, संदीप डेबरे, विठ्ठल शेजूळ, अविनाश कुरूमकर, अमित कोल्हे, शब्बीर शेख, गोकुळ नेटके, ऋषीकेश निबे, अंकुश भोसले, भाऊसाहेब पवार, नितीन खांदे, रोहित शेटे, श्याम तारडे, सुनील कोल्हे, सोमनाथ वने, हर्षद धोंडे आदिंनी केली आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 15774

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *