‘डिजिटल इंडिया’च्या युगात भंडारदरा परिसरातील नागरिकांची नेटवर्कसाठी कसरत बीएसएनएलचा टॉवर असूनही नेटवर्क गायब; इतर कंपन्यांनी सेवा देण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील मुलभूत सोयी-सुविधांपासून कायमच वंचित असणार्‍या गावांमध्ये ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न बघताना नेटवर्कसाठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरण परिसरातील शेंडी व पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये बीएसएनएलच्या नेटवर्कचे कायमच दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने इतर कंपन्यांची सेवा तातडीने भंडारदरा परिसरात सुरु करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुतखेल, कोलटेंबे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, पांजरे, मुरशेत, लव्हाळवाडी, शिंगणवाडी अशी नऊ गावे असून या गावांमध्ये आदिवासी बांधवांचे मोठे वास्तव्य आहे. मात्र, नेहमीप्रमाणे कायमच मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असणार्‍या या भागाला आता डिजिटल इंडियाच्या दिव्य स्वप्नात नेटवर्कसाठी कसरत करावी लागत आहे. जगाच्या पाठीवर स्मार्टफोनचा बोलबाला असताना बरेच दिवस ही गावे मात्र मोबाईलच्या नेटवर्क सेवेपासून दूर होती. या लोकांच्या मागणीनुसार पाच ते सहा वर्षांपासून भारत दूरसंचार निगम लिमिटेड या शासकीय कंपनीने या भागात नेटवर्क सेवा देणे सुरु केल्याने आदिवासी जनतेत समाधानाचे वातावरण पसरले होते. ही सेवा सुरळीतपणे सुरु राहावी यासाठी मुरशेत येथील टेबल टॉपवर एका टॉवरचीही उभारणी करण्यात आली होती. पंरतु या सेवेत कायम सातत्य ठेवणे या सरकारी कंपनीला शक्य होताना दिसत नाही.

कधी पावसाच्या अडचणीचे कारण देत तर कधी वीजेचे कारण देत महिन्यातून 15 दिवस यांची सेवाच बंद असते. आदिवासी भागातील प्रत्येक घरटी कमीत कमी एका सदस्याकडे तरी मोबाईल आहे. हजारो रुपयांचे उत्पन्न या कंपनीला या भागातून मिळत असूनही मुरशेत येथील टॉवरवर वीज गेल्यावर जनित्र उपलब्ध नसल्याने भंडारदरा परिसरात तासोनतास नेटवर्क मिळत नाही. नवगाव डांगाणाच्या लोकांनी बीएसएनएलची सेवा सुरु झाल्याने पोटाला चिमटा देत जमेल त्या पद्धतीने मोबाईल विकत घेतले. परंतु आता बीएसएनएलची नेटवर्किंग सेवा कायमच खंडीत पडत असल्याने विनाकारण मोबाईल घेतले असे ही भोळी भाबडी जनता बोलू लागली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेले असल्याने भंडारदर्‍याच्या आदिवासी भागातही कोरोनाचा लॉकडाऊन पडला. सर्व सामान्यांचे जीवनही जागेवरच थबकले. शिक्षणाची व्यवस्था ऑनलाईन सुरु झाली. पंरतु भंडारदर्‍याच्या आदिवासी भागातही ऑनलाईन शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. कारण या भागात बीएसएनएलची नेटवर्किंग सेवा कायम स्वरुपात कधीच नव्हती. बरेच शालेय विद्यार्थी इतर कंपन्यांच्या नेटवर्किंगसाठी रानोमाळ भटकत ऑनलाईन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करायची. काहींनी नेटवर्क शोधण्यासाठी डोंगराच्या कडेकपारीचाही आसरा घेतला. पण काहीच फायदा झाला नाही. विद्यार्थ्यांना या शासकीय सेवेच्या नेटवर्किंगचा जबरदस्त फटका बसला असून ऑनलाईन पेपर सुरु होताच बीएसएनएलचे नेटवर्क गेल्याने त्यांना नापासाच्या पंक्तीत बसावे लागले. भंडारदर्‍याच्या आदिवासी भागाबरोबरच शेंडी परिसरातील अनेक गावांमध्ये बीएसएनएलचे असंख्य ग्राहक आहेत. हे ग्राहक प्रत्येक महिन्याला 99, 118, 153, 197, 198, 397, 499 रुपयांचे असे वेगवेगळे रिचार्ज मारत असतात. पंरतु प्रत्यक्षात मात्र बीएसएनएलची एका महिन्यात 15 दिवसही मिळत नसल्याने आदिवासी बांधवांची आता बीएसएनएल रिचार्जच्या रुपात सरळ लुटमार करत असल्याचे दिसून येत आहे. मुरशेत येथे हा टॉवर उभा असून तो केवळ दिखावा तर नाही ना असाही प्रश्न आदिवासी बांधवांना पडला आहे. भंडारदर्‍याच्या शेंडी परिसरात या सेवेव्यतिरिक्त एअरटेल, वोडाफोन, आयडिया या कंपन्यांच्या सेवा बर्‍यापैकी मिळून येत असल्याने भंडारदर्‍याच्या रिंगरोडलाही या कंपन्यांची सेवा जोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे. देव करो आणि बीएसएनएल कंपनीला जाग येवो असे लोक आता म्हणू लागले आहेत.

Visits: 9 Today: 1 Total: 79730

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *