साकूरमध्ये फर्निचरच्या दुकानातून लांबवले टीव्ही

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील साकूर येथे गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (ता.14) पहाटेच्या सुमारास उमरभैय्या गणीभाई मणियार यांच्या ‘सना फर्निचर’च्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 47 हजार रुपयांचे एलईडी टीव्ही चोरुन पोबारा केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साकूर चौफुलीजवळील सना फर्निचरच्या दुकानात बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील 1 लाख 47 हजार रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे एलईडी टीव्ही चोरुन पोबारा केला आहे. नेहमीप्रमाणे मालक मणियार हे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी उमरभैय्या मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 236/2021 भादंवि कलम 461, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापूर्वीही चोरट्यांनी साकूर येथे अशाच पद्धतीने दुकाने फोडली आहेत. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Visits: 167 Today: 1 Total: 2129133

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *