सतीश देशमुख यांची भारतीय प्रशासकीय सेवेत बढती
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील सुगाव बुद्रुक मधील शेतकरी कुटुंबात जन्मलेले सतीश गंगाधर देशमुख यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. कोणताही शैक्षणिक वारसा नसताना आपलं ध्येय निश्चित करून स्वयंकष्टाने व भावांच्या साथीने वयाच्या 23 व्या वर्षीच तहसीलदार म्हणून आपल्या कामाला सुरुवात करून निष्कलंक सेवा केली. आज त्याचे फळ मिळाले असून, भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांना बढती मिळाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकाच वेळी तहसीलदार, सहाय्यक वनसंरक्षक, कृषी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर सहाय्यक, मंत्रालय सहाय्यक या सर्व पदांसाठी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेले सतीश देशमुख यांची स्टेट बँक ऑफ इंडियामधे प्रॉबेशनरी ऑफिसर म्हणून देखील निवड झाली होती. मात्र, वयाच्या तेविसाव्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत त्यांनी राजपत्रित अधिकारी म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. महसूल विभागात काम करताना रावेर (जि. जळगाव) तहसीलदार, उप विभागीय अधिकारी देगलूर (जि. नांदेड), निवासी उपजिल्हाधिकारी अहमदनगर, निवासी उपजिल्हाधिकारी धुळे, प्रादेशिक अधिकारी एम.आय.डी.सी. ठाणे, उपायुक्त महसूल नाशिक विभाग, अप्पर जिल्हाधिकारी पालघर, अध्यक्ष जात पडताळणी समिती ठाणे, कोकण भवन नवी मुंबई इत्यादी पदांवर आपल्या कामाने, बुद्धीचातुर्याने, प्रामाणिकपणा, सजगतेने प्रभावीपणे आपली सेवा दिली. म्हणूनच त्यांना जनगणनेच्या उत्कृष्ट कामाबद्दल राष्ट्रपतींचे सिल्व्हर मेडल, उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी, शासनाकडून आगावू वेतनवाढ, अत्त्युत्कृष्ट गोपनीय अहवाल, संपूर्ण सेवा कालात निष्कलंक सेवा असे पुरस्कार मिळाले आहेत. नुकतीच त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत बढती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवृत्ती महाराज देशमुख, माजी मंत्री मधुकर पिचड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, भारतीय प्रशासकीय अधिकारी शिवाजी देशमुख, भास्कर मुंडे, दिलीप बंड, विकास देशमुख, निर्मलकुमार देशमुख, सुभाष डुंबरे, ओमप्रकाश देशमुख, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, माणिक गुरव, रामदास खेडकर, उमेश वाघ, मनोज घोडे, मनोज गोहाड, बाबासाहेब शिंदे, चंद्रशेखर देशमुख, महेंद्र पवार, ओंकार देशमुख, संगमनेर भागाचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, अकोले तहसीलदार मुकेश कांबळे, अनिल पवार, दिलीप शिंदे, विनायक देशमुख, कृष्णराव देशमुख, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते, माणिक देशमुख, दीपक महाराज देशमुख, मधुकर तळपाडे, विजय चौधरी, अजित देशमुख आदिंनी अभिनंदन केले आहे.