संगमनेरात गोवंशाच्या कत्तली सुरुच! आता मोगलपूर्‍यातील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे राज्यातील सर्वात मोठी कारवाई होवूनही पोलिस अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयोग सुरु असतांना दुसरीकडे पोलिसांनी मोगलपूरा भागात छापे घालून सुमारे साडेपाचशे किलो गोवंशाचे मांस जप्त केले आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. एकीकडे संगमनेरच्या कत्तलखान्यांवरुन रान उठलेले असताना दुसरीकडे कत्तलखाने सुरुच असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारवार्ई करण्यात आलेले पाचही कत्तलखाने घरगुती स्वरुपाचे किरकोळ होते.

आज (ता.9) सकाळी सातच्या सुमारास संगमनेर शहर पोलिसांनी मोगलपूरा भागात असलेल्या कत्तलखान्यांवर छापे घातले. या भागात स्थानिक पातळीवर विक्री होणार्‍या गोवंश कत्तलखान्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पोलिसांनी एकाचवेळी पाच ठिकाणी छापे घालून तेथील गोवंशाचे मांस एकत्रित केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून एकजण घठनास्ळावरुन पसार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे.

गेल्याच आठवड्यात संगमनेरात आजवरची सर्वात मोठी कारवाई झाली होती. या कारवाईत पोलिसांनी 31 हजार किलो गोवंशाचे मांस व त्यासह अन्य मुद्देमाल असा जवळपास एक कोटीहून अधिक मुद्देमालही हस्तगत केला होता. सदरची कारवाई प्राणीकल्याण अधिकारी यतीन जैन यांच्या माहितीवरुन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने झाली होती. या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यासाठी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक वगळता उर्वरीत दोन्ही अधिकारी नियंत्रण कक्षातील होते.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दितील कारवाया शक्यतो स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत होतात. या कारवाईत पोलीस अधीक्षकांनी त्यांनाही अंधारातच ठेवले हाते. या कारवाईनंतर कत्तलखान्यांच्या अंतरंगातील छायाचित्र व्हायरल झाल्याने मोठा जनक्षोभ उसळला होता. तो शांत होण्याआधीच संगमनेरात पुन्हा एकदा पाच कत्तलखान्यांवर छापे पडल्याने येथील अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Visits: 5 Today: 2 Total: 21251

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *